Type Here to Get Search Results !

शिवछत्रपतींचे भविष्यवेधी, धोरण


शिवछत्रपतींचे भविष्यवेधी, धोरण
 हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती हे अखंड देशाचे प्रेरणास्थान असून, अठरापगड जातींच्या लोकांचे संघटन करून स्वराज्य स्थापन करणारे युगप्रवर्तक आहेत. अर्थात कुशल प्रशासक, उत्कृष्ट योद्धा व प्रजाहितदक्ष    सर्वगुणसंपन्न अशा या राजाला जागतिक तसेच  देशाच्या इतिहासात अत्युच्च स्थान आहे. शिवछत्रपतींनी सहा जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून देशाच्या गौरवशाली संस्कृतीचे खऱ्या अर्थाने रक्षण केले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा महाराष्ट्र भूमीला मिळाला. एकंदरीतच महाराजांच्या आयुष्यातली ध्येय,धोरणे, समाजनिती, राजनीती, युद्धनीती, अर्थकारण, व्यवस्थापण तंत्र, मानवतावाद, पर्यावरण संवर्धन आणि भविष्याचा वेध घेणारे द्रष्टेपण यातून आजदेखील भरपूर काही घेण्यासारखे आहे.
स्वयनिर्भर स्वराज्याचा आग्रह
स्वंयनिर्भर स्वराज्याचा फार व्यापक आणि देशाच्या प्रगतीसाठी समर्पक अर्थ छत्रपतींनी आपल्यासमोर ठेवला आहे. सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे बऱ्याच देशांची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यावर देखील त्यांनी '' स्वयनिर्भरता म्हणजे स्वराज्याची स्वयंपूर्णता'' असा मंत्र दिला आहे. जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन व मागणीला महत्त्व देणे गरजेचे आहे. परदेशी वस्तूंचा वापर केल्याने आपले चलन परदेशात खर्च करावे लागते. सध्याच्या काळात वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती यामुळे देशाची आयात, व्यापार तूट, परदेशी चलनांच्या तुलनेत  रुपयाचे घटते मूल्य सर्व समस्यांच्या मुळाशी छत्रपतींच्या तत्कालिन  कल्पनेतील स्वयनिर्भर स्वराज्याचा दृष्टीकोन किती धोरणी होता हे  समजून येते. 
  लोककल्याणकारी  ध्येय धोरणांचा स्वीकार 
प्रजा सुखी तर राजा सुखी’ या सूत्रानुसार शिवाजी महाराजांनी आपल्या कृषी व्यवस्थापनातून रयतेचे सर्वाधिक कल्याण साध्य करण्याचा प्रयत्न केला. ‘त्यांनी हिंदवी स्वराज्यात लोककल्याणाची हमी दिली. काळ्या आईची सेवा करणार्याा शेतकर्याणला दुष्काळ, अतिवृष्टी व अवर्षणाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतू आजची परीस्थिती पहिली तर  शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली  दबलेला असुन वारंवार आत्महत्या करीत असल्याचे निर्दशनास येते. एकीकडे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही, तर दुसरीकडे धान्याची आयात केली जात आहे. त्यामुळे कवडीमोल भावाने  शेतमाल विकावा लागत असल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना आधार देऊन उभे करण्यासाठी शिवरायांच्या लोककल्याणकारी शेतकरी धोरणाचा फेरविचार महत्वाचा ठरतो.
 समृध्द कृषी व्यवस्थांपणावर भर 
महारांजानी जलव्यवस्थपनाबाबत विशेष दक्षता बाळगुन  गडकोटांवर मुबलक जलसंचयाची साधने उपलब्ध केल्याचे संदर्भ आढळून येतात. शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात म्हटले आहे की, गडावर झऱ्याचे पाणी भरपूर आहे म्हणून त्यावर विसंबून न राहता एकदोन तळी अधिक बांधून राखीव ठेवावी. प्रसंगी ती कामास येतील हे लक्षात घेऊन व निसर्गचक्राचा रोख पाहून यापुढे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे किती गरजेचे आहे, हे अलीकडचे बदलते वातावरण पाहून आपल्या लक्षात आले आहे. स्वराज्यात अनेक ठिकाणी नद्या व कालवे अडवून धरणे बांधली, स्वराज्यात नदीनाल्यांवर बंधारे बांधून पाण्याच्या साठवणाची व्यवस्था केली. कृषी जीवन सुखी व संपन्नक करण्यावर त्यांनी भर दिला.  हिंदवी स्वराज्याचा शेती हा आधार होता. त्यामुळे त्यांनी योजलेले उपाय शेतकर्यांबना सुखी व संपन्नि करणारे ठरले.  राजांच्या भक्कयम कृषी व जलव्यवस्थापन धोरणामुळे आजही महाराष्ट्रात कृषी व्यवस्था टिकून राहिली.   लोकांचा मुख्य व्यवसाय असणार्याज शेतीच्या विकासासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या. शेतीसाठी आवश्यक पाणी साठ्यासाठी विशेष प्रयत्न केले. शेतकर्यांाना शेतीसाठीच्या साधन-सामग्री उपलब्ध करून दिल्या. शेतसारा व तत्सम करात सूट दिली. जमीन मोजण्याच्या सोप्या पद्धती विकसित केल्या. सावकारी पाशातून लोकांची मुक्ताता केली. शेती व पूरक व्यवसायांना बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या. वस्तूंचे दर ठरविण्यात आले. चलन विकसित केले. व्यापाराकरिता डोंगर-दर्या्त घाट रस्ता बांधणी, आरमार निर्मिती केली. यामुळे शिवछत्रपतींचा काळ म्हणजे केवळ लढाया आणि राजकारणापुरता मर्यादित नव्हता, तर या काळात रयतेच्या कल्याणासाठी आवश्यक विविध योजनांचा पाया घालण्यात आला. हे छत्रपतींच्या स्वराज्याचे वेगळेपण निश्चितच वर्तमानकालीन स्थितीला मार्गदर्शक ठरणारे आहे.  
पर्यावरण व्यवस्थापन
छत्रपती शिवरायांनी 'गड तेथे आमराई, गाव तेथे वनराई'! हा नारा आपल्या आज्ञापत्रातून देवून त्याकाळी जंगल संपत्तीचे मोठेपण समजून घेतले. पर्यावरण आणि माणूस ह्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि अवलंबित्व महाराजांनी ओळखले होते. आणि म्हणूनच स्वराज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास त्यांनी होऊ दिला नाही. उलट मुलुखात असलेल्या वनराईची कायम काळजी घेतली. गडकोटांच्या परिसरात वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा ह्या वृक्षांची लागवड करुन आरमार बांधण्यासाठी साग आणि शिसवीचा वापर करीत स्वराज्य हे पर्यावरणपूरक कसे राहील ह्याची सर्वतोपरी काळजी घेतली होती. यावरुन त्यांचा पर्यावरणाविषयीचा उदात्त हेतू स्पष्टपणे दिसून येतो. परंतू आज विकासाच्या नावाखाली वारेमाप वृक्षांच्या कत्तलीमुळे माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे वरदान ठरलेली जंगले नष्ट होत आहेत. आपल्या पूर्वजांनी   लाखो वर्षापासून जतन केलेल्या वड, पिपरण चिंच, आंबा, जांभूळ, कडूनिंब, करंज,  निलगिरी  व सागवान यासारख्या पर्यावरणस्नेही वृक्षाच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय बदलाचे संकट उभारले आहे. म्हणुन महाराजांचा  त्यावेळी असलेला पर्यावरण विषयक उदात्त हेतू  आजच्या स्थितीला नक्कीच अंर्तमुख होवून विचार करायला  लावणारा नक्कीच ठरतो.
कर्तव्यदक्ष राजे 
आज समाजामध्ये  घडणाऱ्या महिला विरोधी गुन्ह्यांच्या घटना पाहिल्या की, शिवरायांच्या विचारांची कधी नव्हे ते एवढी गरज असल्याचे प्रक्रर्षाने जाणवते.  छत्रपती शिवाजी महाराज हे जसे दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते तसेच अत्यंत सूक्ष्म दृष्टीने राज्यकारभार करणारे प्रजाहितदक्ष राजेही होते. महाराजांचा समकालीन कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो "लष्करांत बायको व बटकी व कलावंतीण नसावी जो बाळगील त्याची गर्दन मारावी पर मुलखात पोर बायका न धरावीं. मर्दाना सापडला तर धरावा. गाई न धरावीं. बईल ओझ्यास मात्र धरावा. ब्राह्मणांस उपद्रव न द्यावा. खंडणी केल्या जागां ओळखियांसी ब्राह्मण न घ्यावा. कोणी बदअमल न करावा." छत्रपतींच्या स्वराज्यात स्त्रीसंबंधी गुन्ह्याला क्षमा नव्हतीच व कठोर शिक्षा होती. मग तो कुणीही असो. साधा शिपाई, वतनदार, किल्लेदार, कुणालाही माफी नव्हती. हातपाय तोडणे, देहदंड, डोळे काढणे आदि शिक्षा दिल्या जात. त्यांनी स्त्रियांविषयी जे क्रांतिकारी धोरण ठरविले आणि अमलात आणले त्याबाबत  आज फेरविचार होणे गरजेचे आहे. 
छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्व दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबल इच्छाशक्ती, मुत्सुध्दी, रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा अशा बहुविध गुणांनी परिपूर्ण होते.  त्यामुळेच समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
"या भुमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्रधर्म राहिला काही तुम्हाकारणें ।।" आज समाजविघातक प्रवृत्ती फोफावत असताना नीतिमूल्याचा कमालीचा ह्रास होत असताना,  शिवरायांनी भक्कम अशा लोकशाहीच्या तत्त्वावर उभारलेले स्वराज्य,  त्यांचे आचार-विचार व राष्ट्राच्या जडघडणीतील भूमिका, शासन व न्याय व्यवस्था,सामाजिक धोरण त्याचबरोबर लोककल्यानकारी ध्येय धोरणांची पारदर्शक व प्रभावी  आंमलबजावणी करत असताना  शेती, प्रजा, पर्यावरण  याविषयी असलेला  त्यांचा बहूआयामी दृष्टीकोन यावर सखोल चिंतन होणे महत्वपूर्ण ठरते. आजच्या परिस्थितीमध्ये महारांजाच्या अनेक धोरणांची प्रकर्षाने उणीव भासते. शिवछत्रपतींनी मोठ्या दूरदृष्टीने  ‘प्रतिपचंद्ररेखेव वर्धिष्णू’ अशा स्थापलेल्या स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करावयाचे असेल, तर महाराजांच्या स्वराज्याविषयीच्या ध्येय धोरणांना , प्रगल्भ विचारांना नव्या पिढीत  रुजविण्याची नितांत आवश्यकता आहे. 
               डॉ नितीन बाबर
           सहायक प्राध्यापक 
       अर्थशास्त्र विभाग सांगोला महाविदयालय सांगोला


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies