माणदेशी साहित्य संमेलन : नवी उमेद, नवी आशा

माणदेशी साहित्य संमेलन : नवी उमेद, नवी आशा


माणदेशी साहित्य संमेलन : नवी उमेद, नवी आशा


श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडीच्या भव्य पटांगणामध्ये नुकतेच चौथे माणदेशी मराठी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रणधीर शिंदे यांनी माणदेशचा भरड माळरान आपल्या संशोधनात्मक लेखणीने नांगरला आहे. डॉ. रणधीर शिंदे हे शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांनी नांगरलेल्या माळरानावर भविष्यात कोणते साहित्यिक पिक येणार?  ते पाहणं महत्वाचं ठरेल. का माळराणावरती वाळून गेलेल्या गवताप्रमाणे त्यांनी मांडलेल्या भूमिकेचे होणार? हा प्रश्न आहे. मुळात ग. दि. माडगूळकर, व्यंकटेशतात्या माडगूळकर, डॉ. शंकरराव खरात, ना.स. इनामदार अशी चार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माणदेशाने पुरविले. माणदेशात कायम  दुष्काळ! खडकाशी झट्या-झोंब खाऊन जिंदगी बरबाद करणारे लोक खूप  सापडतील.  त्यांचा संर्घष जुना आदिम कालखंडापासून आहे. पण,  संर्घष पचवून इथला माणूस जगाला शहाणपण शिकवतो. अनेकांनी माणदेशातील माणसांविषयी, साहित्याविषयी समीक्षा लिहीली. त्यामध्ये बिनीचे शिलेदार डॉ.कृष्णा इंगोले व डॉ.सयाजीराजे मोकाशी महत्वाचे आहेत. अलीकडे त्यामध्ये आनेकांची भर पडत आहे. ग.दि. माडगूळकर, व्यंकटेशतात्या माडगूळकर, डॉ. शंकराव खरात, ना.स.इनामदार, शांताबाई कांबळे, डॉ. अरुण कांबळे,  नानासाहेब झोडगे, उत्तम बंडू तुपे,  कथाकार सुनील दबडे, रमेश जावीर, प्रा. संभाजी गायकवाड, दिनकर कुटे, जोतिराम फडतरे, सिताराम सावंत, मेघाताई पाटील, आनंद विंगकर अशी कितीतरी कथा, कादंबऱ्या लिहिणारी माणसे; त्याचबरोबर कवितेच्या प्रांतातही लेखन करणारी मंडळी खूप!  
अलीकडे चित्रपट क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे प्राध्यापक बालाजी वाघमोडे, विजय देवकर, किरण जावीर, सिया पाटील ही मंडळी खूप! या सगळ्यांनीच हा माणदेश काळजात जपला. माणदेशातील वेगवेगळी रूपे माणसं तळहातावरच्या फोडासारखी जपली. इथली तूर, मटकी, बाजरी, ज्वारीची पिके डोळा भरून पाहिली. इथली खिलार जनावरे, अखंड प्रदेशच आपल्या कलाकृतींमधून मांडला. त्यामुळे माणदेशामध्ये अशा साहित्य संमेलनाची गरज होती ती' महाराष्ट्र साहित्य परिषद, आटपाडी शाखा' आणि श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाने पूर्ण केली हे महत्त्वाचे आहे.  माजी जि.प. अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख यांनी मोठ्या हिमतीने जबाबदारी पार पाडली. त्यामुळे त्यांनाही दाद देणे गरजेचे आहे.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रणधीर शिंदे यांनी नव्याने माणदेशची भूमी नांगरली आहे. इथल्या श्रद्धा स्थानाची तसेच माणदेशी साहित्याची चिकित्सा केली आहे. माणदेशची ही भूमी गवळी धनगरांची भूमी आहे अशी मांडणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर करगणीचे मंदिर हे लखमेश्वराचे मंदिर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी ही नाळ पंढरपूरच्या विठ्ठलापर्यंत जोडत नेली आहे. खरंतर यापूर्वीही याच्या वरती भरपूर लिखाण झाले आहे. विठ्ठलावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संशोधन आणि करगणीच्या राम मंदिरावरती डॉ. अरुण कांबळे  यांनी केलेलं संशोधन महत्त्वाचे आहे. डॉ. शंकरराव खरात यांनीही  समीक्षा लिहिली आहे .त्यामुळे, रणधीर शिंदे यांनीही नांगरलेल्या भूमीत आता नेमकी कोणती बीजे रुजणार?  हा प्रश्न आहे इतिहासाच्या खोलात गेलो की माणदेशच्या भूमी ची वेगळीच रूपे सापडतील. नागवंशीच्या, आर्य-अनार्यांच्या संघर्षाच्या खुणा सापडतील. तसेच, वारकरी, नाथ, महानुभाव, बौद्ध संप्रदायाच्याही खुणा सापडतील. त्यामुळे ,पेरणी, दुबार पेरणी होत राहील. पण, माणदेशी संस्कृतीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. माणदेशी माणूस म.गो. पाठकांच्या 'संत वाहते कृष्णामाई सारखा' आहे. तो मान सन्मान प्रतिष्ठा यापासून लाजरा-बुजरा आहे. त्यात तो ग्रामीण, दलित, स्त्रीवादी अशी वर्गवारी करत नाही. सगळ्यांनाच पोटात घेऊन वाहणारी माणदेशची ही संस्कृती आहे. यामुळे कदाचित वेगळा माणदेशी साहित्य प्रवाह आकाराला येईल. शहरी कोलाहलापासून हा प्रदेश तसा अलिप्तच! त्यामुळे रणधीर शिंदे यांनी माणदेशी साहित्याकडून व्यक्त केलेली अपेक्षा कशी पूर्ण होते ते पाहणे महत्वाचे ठरेल. सध्या अनेक नवोदित लेखक, कवी लिहीत आहेत. पण, जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे ."माणदेश आमच्या नजरेतून" या परिसंवादात सिताराम सावंत, आनंद विंगकर, दिनकर कुटे, मेघाताई पाटील यांनी मांडलेली भूमिका विचार करायला लावणारी आहे." माणदेश आता पूर्वीसारखा राहिला नाही तो बदलतोय. तो बदललेला माणदेश शब्दात पकडणे गरजेचे आहे." पण, केवळ नाव आणि प्रसिद्धी यासाठी हपापलेला कवी, लेखक बदललेला माणदेश साहित्यात आणणार का? हा प्रश्न आहे त्यासाठी निकोप, जोमदार रोप पाहून त्याचं संवर्धन करावं लागेल. जागतिक संदर्भ लक्षात घेऊन डाळिंबीच्या छाटणीसारखा लेखक-कवी छाटून घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये जाणीव जागृती करावी लागेल. अर्थात, इथे दर्जेदार समीक्षक भरपूर आहेत. डॉ. कृष्णा इंगोले, डॉ. सयाजीराजे मोकाशी, डॉ. श्याम सुंदर मिरजकर आणि इतर समीक्षकांचंही इकडे लक्ष असणार आहे. प्रा. विजय शिंदे,  प्रा. बालाजी वाघमोडे, प्रा . निलेश शेळके, प्रा. राजाराम पाटील, प्रा. मुकुंद वलेकर यांच्यावरची मोठी जबाबदारी आलेली आहे.
           प्रा. बालाजी वाघमोडे


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments