"नापास" ऐवजी शिक्षणावर सरकार भर देणार का?


शिक्षणाचा खेळखंडोबा कधी थांबणार.....?माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) निर्णय जाहीर केला आहे की, इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रके वर नापास (फेल) असा शेरा मारणे ही पद्धत बंद करण्यात येणार आहे. त्यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, या शेऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो. विद्यार्थ्यांना त्यामुळे अपमानास्पद वाटते.  हा निर्णय घेताना त्यांनी पंतप्रधान  यांच्या 'परीक्षा पे चर्चा ' या कार्यक्रमाचा संदर्भ दिला आहे. मोदी या चर्चेत म्हणाले होते की,  ' एखाद्या परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून कोणी जीवनाच्या परीक्षेत नापास होत नाही व तसा शिक्का मारणे ही बरोबर नाही.  खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय शिक्षण मंडळ यांना विद्यार्थ्यांची व त्यांच्या भविष्याची काळजी वाटते का?  त्यांच्या शिक्षणाची, मानसिकतेची व भावी जीवनाची काळजी वाटते का? विद्यार्थ्यांची काळजी करत असतील तर, वरील निर्णय योग्य की आयोग्य? काळजी करत नसतील तर मग ते असे निर्णय का घेत असावेत? असे विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या शिक्षण विषयक धोरणासंदर्भात अनंत प्रश्न निर्माण होत आहे. सर्वसामान्यपणे शिक्षणाचा अर्थ, हेतू व महत्व याविषयी विचार व्यक्त करताना सांगितले आहे की, शिक्षण विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करते; चांगले जीवन जगण्यास मदत करते ते शिक्षण; चारित्र्यवान बनवते ते शिक्षण; व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करते ते शिक्षण ; ज्ञानार्जन करण्यास प्रवृत्त करते ते शिक्षण; योग्य व अयोग्य गोष्टीचे वर्गीकरण करण्यात मदत करते ते शिक्षण व किमान लिहिण्या-वाचण्यास शिकवते ते शिक्षण. 
नरेंद्र मोदी आणि सीबीएसई मंडळाच्या वरील निर्णयामुळे वरील पैकी कोणता शिक्षणाचा हेतू साध्य होतो, हे कळत नाही. कारण विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्याशिवाय वरील सर्व गोष्टी साध्य होणार नाहीत. अभ्यास न करता, त्यांच्यावर संस्कार होणार नाहीत. त्यांना ज्ञान मिळणार नाही, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणार नाही, त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी नोकरी मिळणार नाही किंबहुना विद्यार्थ्यांना चांगले वाचता व लिहिता सुद्धा येणार नाही. या सर्व गोष्टी साध्य व्हाव्यात असे वाटत असेल तर विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागेल, अभ्यासाचे चिंतन- मनन करावे लागेल, पाठांतर करावे लागेल, नियमीत लिहिणे-वाचने ठेवावे लागेल. याला दुसरा कोणताच पर्याय असू शकत नाही. या सर्वांची चाचणी घेण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. परीक्षेच्या माध्यमातून मुलांच्या अभ्यासाचे प्रमाण तपासले जाते. एखाद्या विद्यार्थ्याला जर पन्नास टक्के गुण मिळाले तर त्याचा त्या वर्गातील नियोजित अभ्यासक्रम 50 टक्के झाला आहे, असा अंदाज बांधला जातो. एखाद्या विद्यार्थ्याला दहावी किंवा बारावी मध्ये चांगले गुण अपेक्षित असतील तर त्याला चांगला अभ्यास करावाच लागेल आणि तो करतो सुद्धा. मार्क ही त्याला चांगले मिळतात. एखादा विद्यार्थी अभ्यासात हलगर्जीपणा करत असेल तर त्याच्या अभ्यासाच्या प्रमाणात त्याला मार्क मिळतात, जर एखादा विद्यार्थी किमान 35 टक्के ही अभ्यास करत नसेल तर त्याला परीक्षेमध्ये नापास होण्याशिवाय पर्याय नाही. नापास झालेल्या विद्यार्थ्याला व त्याच्या पालकांना हे माहीत असते की जो विद्यार्थी अभ्यास करत नाही, तो नापासच होतो. येथे ' नापास ' या शब्दाचा विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मानसिकतेवर कोणताही परिणाम होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण त्यांची मानसिकता भक्कम झालेली असते. जो अभ्यास करेल तो पास होईल व न करेल तो नापास होईल. मात्र जे विद्यार्थी भरपूर अभ्यास करतात, कष्ट घेतात, त्यांचे पालकही त्यांना मदत करतात, ते विद्यार्थी परीक्षेत चांगल्या मार्काने पास होतात. चांगले मार्क मिळाल्यामुळे अभ्यासाची गोडी निर्माण होते. आत्मविश्वास वाढतो व पुढे-पुढे ही मुले चांगले शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवतात. नरेंद्र मोदी व त्यांचा शिक्षण विभाग शिक्षणात अशा प्रकारची ध्येय-धोरणे का राबवत  असावेत?  पाठीमागे काही दिवसांपूर्वी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास न करता पास होता यावे म्हणून प्रत्येक विषयाला अंतर्गत वीस महाराष्ट्राचे कॉलेज अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षा सुरू केल्या, ज्या पूर्णतः बोगस असतात. इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा बाबत तर फार मोठी वाईट परिस्थिती आहे. एकंदरीत माध्यमिक, उच्च माध्यमिक व उच्च शिक्षण विभागात विद्यार्थी व शिक्षकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या अनंत समस्या आहेत. त्यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, नियमित तासांचा अभाव, पात्रताधारक शिक्षकांचा अभाव, शिक्षण संस्थांवर सरकारच्या नियंत्रणाचा अभाव, कायम विनाअनुदानित धोरणामुळे शिक्षकांची होणारी आर्थिक गळचेपी व त्याचा अध्यापनावर होणारा परिणाम, शिक्षक भरतीमध्ये संस्था व शासनाकडून होत असणारा भ्रष्टाचार वशिलेबाजी, देणगी देऊन नोकऱ्या करणारे शिक्षक त्यांची गुणवत्ता, मानसिकता व जबाबदारीचा अभाव व चुकीच्या परीक्षापद्धती यासारख्या अनंत समस्या शिक्षण क्षेत्रात असताना त्या सोडवण्याऐवजी ' नापास ' हा शब्द गुणपत्रकावरून काढून नेमकं या महाशयांना काय साध्य करायचं आहे?
कदाचित महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद इत्यादी महापुरुषांनी शिक्षणाचे सामाजिक महत्त्व ओळखले होते. त्यांनी शिक्षण सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न हाणून तर पाडायचा नाही ना?  कारण शिक्षणाची गुणवत्ता संपली की शिक्षणाचे महत्त्व कमी होतं, महत्त्व कमी झालं की समाज शिक्षणापासून प्रवृत्त होतो, समाज शिक्षणापासून परावृत्त झाला ही समाजात मागासलेपण व अज्ञान येते आणि अशा मागासलेल्या व अज्ञानात जीवन जगणार्या, समाजाचे मुक्तपणे शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय शोषण करता येते. महात्मा फुले यांच्यानंतर बहुजनांच्या जीवनात शिक्षणामुळे प्रकाश निर्माण झाला आहे. त्यांची मुले चांगले शिक्षण घेऊन, मोठमोठ्या पदावर  काम करत आहे. स्वाभिमानाने जीवन जगत आहे, सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रात प्रगती करत आहेत. ‘आरे ला कारे’ व ‘अहोला काहो’ म्हणण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. समाजातील एक आंबेडकर शिकले तर त्यांनी विषमतावादी मनुस्मृति गाडली;  चातुर्वण्य जाती व्यवस्थेला मूठमाती दिली, देशासाठी न भूतो न भविष्यती राज्यघटना अर्पण केली. त्यांचा आदर्श घेऊन बहुजन समाज या शिक्षणाच्या महामार्गावरून गतीने वाटचाल करू लागला आहे. कदाचित याला ब्रेक देण्याचा तर या मनोवृत्तीचा मानस नाही ना? या पासून देशातील सर्व बहुजन समाजाने सावध राहिले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात चांगली धोरणे राबवण्यात सरकारला भाग पाडले पाहिजे. सरकारने शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च करावा, यासाठी आग्रही असले पाहिजे. चांगल्या शिक्षणाच्या प्रगतीआड येणाऱ्या समस्या सोडवण्यास सरकारला भाग पाडले पाहिजे,  तरच देशाचे व महाराष्ट्राचे भविष्य उज्वल आहे. अन्यथा......?


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured