राज्यातील विचारवंतांच्या हत्या व राज्य सरकारचा तपास

राज्यातील विचारवंतांच्या हत्या व राज्य सरकारचा तपास


विचारवंतांची हत्या करून विचार संपत नसतात, तर विचार संपवणारेच संपत असतात. चांगल्या व आदर्श मानवतावादी विचारांचा प्रचार- प्रसार अधिक गतीने होत असतो. ज्या प्रवृत्ती विचारवंतांची हत्या करतात, त्या प्रवृत्ती एक ना एक दिवस समाजासमोर येतात. समाज त्यांना त्यांची जागा दाखवीत असतो. समाज व न्यायव्यवस्था त्यांना त्याच्या दुष्कृत्याची शिक्षा निश्चितपणे देत असते. विचारवंतांची व महापुरुषांची हत्या घडवून आणण्याची परंपरा आपल्या देशाला व महाराष्ट्राला नवीन नाही, कारण आर्य सेनापती वामनाने केलेली बळीराजाची हत्या, , संत तुकारामांची हत्या, छत्रपती शिवाजी महाराजांची व छत्रपती संभाजीराजे यांची तत्कालीन व्यवस्थेने केलेली हत्या, महात्मा गांधीजींची हत्या व डॉ. बाबासाहेबांची प्रस्थापितांच्या कडून झालेली हत्या ही पाठीमागील काळातील जिवंत उदाहरणे आहेत. अलीकडच्या काळात डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे,  डॉ.कलबुर्गी डॉ.कृष्णा किरवले, गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्या सुद्धा याच मनोवृत्तीच्या लोकांच्या कडून नियोजनपूर्वक केलेल्या आहेत, हे आज समाजापुढे हळूहळू येत आहे. पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांच्या ब्राम्हणवादी व्यवस्थेने केलेल्या हत्येला काल पाच वर्षे पूर्ण होत आहेत, तरीही त्यांचे मारेकरी शोधून त्यांना शिक्षा व्हावी ही मानसिकता सरकारची व प्रस्थापित समाज व्यवस्थेची नाही. त्याच्या अगोदर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची हत्या याच मानसिकतेतून झाली आहे. खरेतर डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा विरोध केवळ अंधश्रद्धेला होता, अंधश्रद्धेच्या माध्यमातून होणाऱ्या समाजाच्या शोषणाला होता, ब्राह्मणवादाला त्यांचा विरोध नव्हता. तरीही ब्राह्मणवादी प्रवृत्तीच्या व्यवस्थेने त्यांची हत्या केली, कारण त्यांना कदाचित याची भिती वाटत असेल की, अंधश्रद्धेतून समाज मुक्त झाला तर समाजाचे शोषण थांबेल, देव आणि देवळे यांचे महत्त्व कमी होईल आणि कालांतराने नवीन देव व देवळांची निर्मितीही थांबेल. यामुळे ठराविक लोकांच्या बिगर भांडवली कंपन्या बंद पडतील, ज्या त्यांना भरघोष उत्पन्न करून देतात म्हणजेच नरेंद्र दाभोळकर जरी ब्राह्मण असले तरी ते जे काम करत होते त्यामुळे ब्राह्मण जात बांधवावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता जास्त होती. म्हणून त्यांनी आपल्या दाभोळकरांची  हत्या करताना मागचा-पुढचा विचार केला नाही. त्यांची या नराधमाने गोळ्या घालून हत्या केली. या हत्येचा तपास ही गेली सहा-सात वर्ष रेंगाळत पडला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर 2015 मध्ये कोल्हापुरात दुसरे पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली. या हत्येचे कारण ही तसंच आहे. पानसरे यांच्या माध्यमातून नवीन क्रांतिकारी विचार सर्वसामान्य बहुजन समाजापुढे मांडण्याचे काम चालू होते. 
ते सत्यवादी, साहित्यकार व इतिहासकार असल्यामुळे त्यांच्या विचारातून ते विषमतावादी व मनुवादी व्यवस्थेवर प्रहार करत होते. या प्रस्थापित व्यवस्थेचा विकृत व शोषित चेहरा समाजासमोर आणत होते. परंतु आपल्या पूर्वजांनी अतोनात प्रयत्न करून जपून ठेवलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था, संस्कृती, परंपरा व रूढी यांच्यावर आघात झाला तर आपल्या भावी पिढीचे व जात बांधवांचे भविष्य धोक्यात येईल, याची भीती वाटत असल्यामुळे मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांकडून डॉ. पानसरे यांची हत्या करण्यात आली. नंतरच्या काळात डॉ.कलबुर्गी व डॉ. कृष्णा किरवले, गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्येच्या मागे ही याच प्रवृत्ती असल्याचे तपासातून पुढे येत आहे. या सर्व विचारवंतांना व महापुरुषांना समाजात समता प्रस्थापित करायची होती. सर्व सामान्य माणसांना त्यांचे हक्क व अधिकार याविषयी जागृत करायचे होते. ते रात्रंदिवस शोषणमुक्त समाजाची रचना करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करत होते. ते सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते होते.  आपल्या विद्रोही, परखड व वास्तववादी विचारांच्या माध्यमातून ब्राह्मणवादी व्यवस्थेला हादरे देण्याचे काम या विचारवंतांनी केले. याचा राग मनात धरून एक-एक पुरोगामी विचारवंत टिपण्याचा नियोजनबद्ध कट मनुवादी व्यवस्थेकडून रचला गेला. त्यांचा असा गैरसमज झाला होता की विचारवंताला संपवले की, त्याचे विचार संपतील, सामाजिक परिवर्तनाची चळवळ थांबेल, देशातील पुरोगामी विचारवंतांच्या मनात दहशत निर्माण होईल व ते आपल्या विचारापासून व कार्यापासून परावृत्त होतील. याचाच फायदा घेऊन आपण समाजात पुन्हा प्रतिगामी विचारांची मुळे घट्ट करू व बहुजन समाजाचा होत असलेला सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक विकास बंद करू. समाजात अज्ञान- अंधश्रद्धा व व्यसनाधीनतेचा प्रचार-प्रसार करून पुढच्या पिढ्यानपिढ्या बहुजनांचे आपण शोषण करत राहू.  परंतु विचारवंतांना संपवून विचार संपत नसतात, कार्यकर्ता संपवून कार्य थांबत नाही, तर विचारवंतांच्या बलीदानामुळे व कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचे विचार व कार्य अधिक प्रभावशाली, बलशाली व समाजमान्य होत असते. खऱ्या अर्थाने सामाजिक  फरक कळतो, त्यामुळे विचारवंत व त्यांच्या विचारांना संपवण्या ऐवजी त्यांच्या विचारांचा आदर्श जोपासा. निश्चित तुमचे-आमचे व संपूर्ण भारतीय समाजाचे भविष्य उज्वल होण्यास वेळ लागणार नाही.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments