दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच संपली

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच संपली. या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी, भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पार्टी यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. केंद्रातील सत्तेच्या जोरावर भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी विरुद्ध सर्व शक्ती पणाला लावून त्यांना 'देश के दुश्मन' ठरवण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रातील सर्व मंत्री, ज्या-ज्या राज्यांमध्ये त्यांचे सरकार आहे त्या राज्यातील मुख्यमंत्री, आमदार व खासदार या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराची मोहीम राबवली होती. भाजपा व काँग्रेस यांनीही एकमेकांच्या वरती टीका-टिप्पणी करण्याचा भरपूर प्रयत्न केला.  या सर्व घडामोडी नंतर जेव्हा निकाल समोर आला, तेव्हा मात्र सर्वजण चकित झाले कारण दिल्लीच्या 70 विधानसभेच्या जागांपैकी आम आदमी पार्टीला 62 जागा मिळाल्या व त्यांना दिल्लीच्या सत्तेवर आपला अधिकार स्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला, तर भाजपाला केवळ आठ जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसला तर सलग दुसऱ्यांदा शून्यावर समाधान मानावे लागले. भाजपचा पराभव झाल्याचा आनंद काँग्रेस साजरा करत असताना मात्र स्वतःच्या दुरवस्थेकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं, असं निदर्शनास येतं. काँग्रेसची एवढी दुरावस्था होण्या पाठीमागची कारणेही तशीच महत्वाची आहेत. काँग्रेसच्या हाती जवळजवळ पन्नास वर्षे सत्ता असताना सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत समस्याकडे दुर्लक्ष करून, केवळ घराणेशाही, भ्रष्टाचार जातीयवाद, भांडवलशाही, गुंडशाही इत्यादी पोसण्याचे राजकारण केले. 
संविधान, लोकशाही, शिक्षण, आरोग्य व बेकारी इत्यादीची त्यांच्या काळात अत्यंत वाताहात झाली होती. त्यामुळे काँग्रेसला सर्व जनता वैतागली होती. जनतेला बदल हवा होता आणि त्याला पर्याय म्हणून जनतेने भाजपच्या हाती सत्ता दिली. भाजपने या सत्तेचा वापर जनहितासाठी न करता धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठी. संविधान व लोकशाहीची  गळचेपी करण्यासाठी. लोकमताचा अनादर करण्यासाठी, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, रिझर्व बँक व साहित्य-कला क्षेत्रातील विद्वान मंडळी यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी  वापर केला. न्यायव्यवस्था, निवडणूक यंत्रणा, व रिझर्व बँक इत्यादी संस्था स्वतःच्या नियंत्रणाखाली घेतल्यानंतर हुकूमशाही प्रवृत्तीने निर्णय घेण्यात सुरुवात केली. हे करत असताना निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या विविध आश्वालसनांचा  विसर पडला. सत्तेचा वापर जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी, राममंदिर, 370कलम, पुलवामा हल्ला या गोष्टींनाच प्राधान्य दिले व जनतेची दिशाभूल केली. जनतेच्या आता लक्षात आले आहे की, ही माणसं ढोंगी आहेत, खोटारडे आहेत. त्यानंतर सर्वसामान्य जनतेने आपले रौद्ररूप दाखवण्यास सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणून राजस्थान,  मध्यप्रदेश, छत्तीसगड ओरिसा, महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि अशा राज्यांमध्ये भाजपचे सरकार भुईसपाट झालं. 
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने देशप्रेमाचं नाटक, धार्मिकता, दहशत, संविधान व लोकशाहीचा अनादर, भ्रष्टाचार व फेकू प्रवृत्तीला जनतेने नकार दिला. दिल्ली विधानसभेत जनतेने केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला का निवडून दिलं? त्याची कारण ही तशी महत्वाची आहेत. पाठीमागच्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या सरकारने जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्याचं महत्त्वाचं काम केलं. त्यामध्ये चांगले व स्वस्त शिक्षण, मोफत वैद्यकीय सुविधा, 24 तास वीज, नियमीत पिण्याचे पाणी,  प्रवासातील वेगवेगळ्या सुविधा व प्रशासकीय सेवा इत्यादी गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं. त्यांनी धर्मासाठी नाही, तर जनतेच्या सेवेसाठी राजकारण केले. याची पोचपावती म्हणून जनतेने त्यांना भरभरून मतदान केले. यावरून एक गोष्ट मात्र नक्की स्पष्ट होते की, जनतेला धर्मवाद, जातिवाद, भाषावाद व प्रांतवाद नको आहे; भारत-पाकिस्तान वाद नको आहे; हिंदू-मुस्लीम वाद नको आहे; जनतेला महत्वाच्या आहेत, त्यांच्या मूलभूत समस्या. जो पक्ष किंवा सरकार जनतेच्या मुलभूत समस्या प्राधान्यक्रमाने सोडवते, जनतेला आपलं समजते व त्यांच्या सुख-दुःखामध्ये सहभागी होते. त्या सरकारच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहते, याचा बोध भारतातील सर्व राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेत्याने घेणे अपेक्षित आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured