Type Here to Get Search Results !

सम अंक, विषम अंक ? व संशोधन


निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी नुकतेच आपल्या किर्तनाच्या माध्यमातून एका नवीन मानसशास्त्रीय संशोधनाची घोषणा केली आहे. संपूर्ण देशामध्ये त्यांचे तोंड भरुन कौतुक होत आहे. बऱ्याच मोठ्या लोकांची अशी अपेक्षा आहे,  की भारत सरकारच्या वतीने त्यांना मोठे मोठे पुरस्कार द्यावेत. या संशोधनामुळे समाजाचीची अनेक समस्यातून मुक्तता झाली आहे, कारण आज पर्यंत कधीही या गोष्टीचा शोध लागला नव्हता, की एखाद्या दांपत्याला मुलगा हवा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? आणि मुलगी हवी असेल तर काय केलं पाहिजे?  या समस्येमुळे पिढ्या-न-पिढ्या संपूर्ण मानव समाज अज्ञानात व अंधकारात चाचपडत होता. एखाद्या दाम्पत्यांला मुलगा हवा असायचा पण  अनंत प्रयत्न करून ही एकापाठोपाठ एक अशा आठ-दहा मुलीच व्हायच्या, आणि ज्यांना मुलगी हवी असायची, अशा दांपत्यास अनंत प्रयत्न करूनही एकापाठोपाठ एक अगदी नऊ-दहा--बारा मुलेच होत असायची.  बिचारे आपणास अपेक्षित असणाऱ्या संततीसाठी अहोरात्र प्रयत्न करायचे,  देवी-देवतांना नवस बोलायचे, कोंबडी-बकरी कापायचे, ज्योतिषांनी दिलेली फळे किंवा प्रसाद आपल्या पत्नीला खायला द्यायचे व स्वतःही खायचे. पण तरीही अपेक्षित संतती होत नसायची. ज्यांना मुलगा पाहिजे असायचा, त्यांना मुलीच व्हायच्या व ज्यांना मुलगी पाहिजे असायचे त्यांना मात्र मुले होत असायची . बिचारे हताश होऊन जायचे.
भविष्यामध्ये अशा हाताश दाम्पत्यांच्या अपेक्षा पूर्तीसाठी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हे संशोधन नक्कीच दीपस्तंभ असेल यात शंका नाही.  त्यांच्या या संशोधनाचा येणारी पिढी नक्कीच लाभ उठवेल. मुलगा हवा असला कि सम दिवशी पती-पत्नी एकमेकावर प्रेम करतील व मुलगी हवी असेल तर विषम तारखेला एकमेकावर प्रेम करतील व त्यांना मुलगी होईल. मात्र अशुभ तारखेपासून या दाम्पत्यांना थोडं दूरच राहावं लागेल कारण जर त्यांनी अशुभ तारखेला एकमेकावर प्रेम केलं तर अपंग किंवा व्याभिचारी बालक ( मुलगा किंवा मुलगी याचे संशोधन व अभ्यास चालू आहे) जन्मास येईल, पण पुन्हा प्रश्न निर्माण होतो की अशुभ तारीख कोणती? सम की विषम? असो, ते पंचांगकरत्यांना माहित असेल.
निवृत्ती महाराज यांच्या प्रवचनातून जाहीर झालेल्या संशोधनाचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा असे निदर्शनास आले की इंदुरीकर महाराजांनी निश्चितपणे मनुस्मृती व श्री गुरूग्रंथ चरित्र इत्यादी धार्मिक ग्रंथांचा गाढा अभ्यास केलेला असावा.
प्राचीन काळातील साधुसंत, महात्मे व ऋषिमुनीं आशा ग्रंथांचा अभ्यास करायचे व समाजाच्या आणि मानवतेच्या हिताचे उपदेश करायचे. पण अलीकडचे महाराज (भोंदू) समाजहित व मानवता यांना पूरक असणाऱ्या ग्रंथांचा अभ्यास करण्याऐवजी  धार्मिक ग्रंथाचा जास्त अभ्यास करतात. कारण अशा धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करूनच समाजात जातीयता व विषमता  निर्माण करता येते; समाजाला अज्ञानात व अंधश्रद्धे मध्ये ठेवता येतं ; समाजाला सत्य काय व असत्य काय?  यातला फरक माहित होऊ द्यायचा नसतो, पण हो,  हे सर्व कशासाठी माहित आहे का?  मुक्तपणे सत्ता- संपत्ती यांची लूट करण्यासाठी, यासाठी कदाचित निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी या सर्व ग्रंथांचा अभ्यास करून त्यांना प्राप्त झालेले नवे संशोधनात्मक विचार समाजाच्या समोर प्रवचनाच्या  माध्यमातून मांडले असावेत. असंच संशोधन सांगलीच्या एका मनोहर भिडे नावाच्या गुरुजींनी शोधून काढले होते . कोणते संशोधन माहित आहे का ?  ते म्हणायचे माझ्या बागेतील आंबे खाल्ले की निसंतान स्त्रीला ही मुले होतात. खरंच किती महत्त्वाचा आहे हे संशोधन नाही का ?  किती त्रास व पैसा वाचला यामुळे महिलांचा? त्यांना लग्न करण्याची गरज नाही , कारण अविवाहित महिलेने  मनोहर भिडे यांच्या बागेतील आंबा खाल्ला की त्यांना मुले होतील. मग पतीची तर काय गरज आहे? कदाचित ह्या संशोधनाचे पहिले प्रात्यक्षिक त्यांनी स्वतः करून पाहिले की काय? कारण  प्रात्यक्षिकातून सिद्ध झालेली माहिती संशोधक समाजाच्या समोर मांडत असतात . या दोन्ही महापुरुषानी ( ? ) मनुस्मृती व श्री गुरुचरित्र यासारख्या ग्रंथांचा अभ्यास आयुष्यभर केल्याचा भास होतोय.l मनुस्मृतीच्या एका अध्यायामध्ये संतानप्राप्तीसाठी वरील प्रकारचे विचार व्यक्त केलेले आहेत, ते असे रजोदर्शनापासून 16 रात्री पर्यंतचा स्त्रियांचा ऋतुकाल असतो, म्हणून त्या काळात गर्भ संभव होऊ शकतो. त्या ऋतू कालातील सम रात्रीला संभोग केला असता, पुत्र प्राप्ति होते, आणि विषम रात्रीला संभोग केला असता , कन्या प्राप्ती होते. श्री गुरु चरित्र ग्रंथाच्या 38 व्या अध्यायामध्ये ही याचा संदर्भ आढळतो तो असा, 
विषम दिवशी कन्या जाणं ! समदिवशी पुत्र सगुना !! 
दहा दिवस ऋतुकाल खुण ! चंद्रावळ असावे !! १२४ !!
ऋतू देना चतुर्थ दिवशी !पुत्र उपजे अल्पायुषी !! 
कन्या होय पाचवे दिवशी ! सहावे दिवशी पुत्र पुरिमेसा!! १२५ !!
अर्थात विषम दिवशी प्रेम केले तर कन्या प्राप्त होते व समदिवशी प्रेम केले तर गुणवान पुत्रप्राप्ती होते. दहा दिवसाचा हा ऋतुकाल असतो असे सांगितले आहे. त्याच्याच पुढच्या ओवी मध्ये असं म्हणतात की चौथा दिवस अशुभ मानला आहे. या दिवशी प्रेम केले तर कमकुवत पुत्र जन्माला येईल. पाचव्या दिवशी प्रेम केलं तर कन्या जन्माला येईल व सहाव्या दिवशी प्रेम केलं तर पुत्र जन्मास येईल. 
अल्प माहितीप्रमाणे गणिताचा, अंकाचा व अक्षरांचा शोध तर माणसाने स्वतःच्या सोयीसाठी लावला. अंकामध्ये पुन्हा त्याने  सम व विषम अंक असे भेद केले. माणसानेच विशिष्ट अंकाला सम नाक म्हणाले व तो सम अंक अंक झाला. विषम अंकाला विषम अंक म्हणला तो विषम अंक झाला. मग मुलगा किंवा मुलगी प्राप्तीची ही प्रक्रिया तर निसर्गाची आहे. निसर्गाला मानवाच्या निर्मितीचाही अगोदर हे माहीत होते का, की मी निर्माण केलेला माणूस पुढे जाऊन सम व विषम अंकाचा शोध लावेल? त्यात अनुसरूनच मानव जन्माच्या अगोदरच निसर्गाने तशी तरतूद केली आहे का? ज्याचे  वर्णन धर्मग्रंथांमध्ये वाचायला मिळते. परंतु धर्मग्रंथ तर मानवानेच लिहिले आहेत. मग मानवाला कसे माहित की मुलगा किंवा मुलगी जन्माची प्रक्रिया वरील प्रमाणे सम व विषम दिवशी होते म्हणून. असो एवढे मात्र निश्चित आहे की, या संशोधनाचा मानव जातीला फायदा होईल.......?


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies