आंबेडकर संस्थेचे कम्युनिटी किचन बनतय निराधारांचा आधार ; दररोज १५० लोकांना पुरवले जाते दोन वेळचे जेवण 

आंबेडकर संस्थेचे कम्युनिटी किचन बनतय निराधारांचा आधार ; दररोज १५० लोकांना पुरवले जाते दोन वेळचे जेवण 


आंबेडकर संस्थेचे कम्युनिटी किचन बनतय निराधारांचा आधार
दररोज १५० लोकांना पुरवले जाते दोन वेळचे जेवण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी:  कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गाच्या  पार्श्वभूमीवर देशात २४  मार्च पासून लॉकडाऊन लागू झाला आहे. लॉकडाऊन नंतर देशात सर्व काही जागच्या जागी थांबले आहे. लोकांचे रोजगार आणि व्यवसाय बंद झाले आहेत. लोकांचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले आहेत. या काळात अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. समाजात अनेक कुटुंबे अशी आहेत ज्यांना लॉकडाऊननंतर आपला उदर निर्वाह चालवणे कठीण झाले आहे. वृद्ध, अपंग, एकल महिला,शेतमजूर, निराधारांची संख्या मोठी आहे. या सर्व बाबीचा विचार करून सांगोल्यातील डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या माध्यमातून डोंगरगाव या ठिकाणी कम्युनिटी किचन ३ एप्रिल पासून सुरु करण्यात आले आहे. या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील डोंगरगाव, सोनंद, लोणविरे, कडलास,गौडवाडी, जुजारपुर, बुद्धेहाळ येथील १४४  निराधार लोकांना गेल्या काही दिवसापासून दररोज दोन वेळचे जेवण पोहोच केले जाते. जेवण पोहोच करण्याच्या कामात दिनकर कांबळे शशिकांत  बाबर, सतिश वायदंडे, तुळशीराम बाबर, आकाश वाघमारे, स्वप्निल बाबर, ऋषिकेश काटे , कडलास येथील निवृत्त सैनिक श्रीकांत पवार, गौडवाडीचे मच्छिंद्र चंदनशिवे आदी विशेष परिश्रम घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात घालण्यात आलेल्या नियमाचे पालन करून लोकांना दररोज दोन वेळचे अन्न पुरवले जाते. अन्न पुरवण्यात येणाऱ्या गावातील ग्रामपंचायत चे सहकार्य यामध्ये मिळत असल्याने रचनात्मक काम संस्थेच्या वतीने होत असून संस्थेच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विषयी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठोकळे व नंदू मोरे यांनी सांगितले कि,लॉकडाऊन नंतर अनेक लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. यामध्ये अनेक लोक असे आहेत ज्यांना कोणाचाही आधार नाही. कित्येक व्यक्ती अशा आहेत ज्यांची मुले-सुना परगावी आहेत. कित्येक लोकांना जेवण बनवून खाणे शक्य नाही. तसेच काही वृद्ध महिला पुरुष वेगळे राहत असल्याने या लॉकडाऊन काळात आधार  देणे आवश्यक आहे. संस्थेने तालुक्यातील काही लोकांना धान्य पुरवण्याचे काम केले असून काही लोकांना दोन वेळचे अन्न पुरवणे गरजेचे असल्याने संस्थेच्या वतीने डोंगरगाव या ठिकाणी किचन सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातुन डोंगरगाव येथील २७, सोनंद २२, लोणविरे २०, कडलास ३०, गौडवाडी १५, जुजारपुर १५ आमी बुद्धेहाळ येथील १५ असे १४४ लोकांना जेवण पुरवण्यात येत असून भविष्यात हा आकडा २०० पर्यंत जाणार आहे. इतर काही गावाची मागणी आल्यास तालुक्यात इतर ठिकाणी स्वतंत्र किचन व्यवस्था करून लॉकडाऊन काळात लोकांना अन्न पुरवठा केला जाणार आहे. या कम्युनिटी किचन साठी स्वराज अभियान, गुंज संस्था तसेच व्यक्तिगत पातळीवर काही लोक  मदत करत असून त्यांच्या सहकार्याने हे किचन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. 

डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून अनेक लोकांची जेवणाची सोय झाली आहे. लॉकडाऊन काळात गरज असलेल्या लोकांना अतिशय चांगल्या प्रतीचे जेवण पुरवण्यात येत असून लोकांमध्ये समाधान असल्याचे दिसून येत आहे. गरजू लोकांची संख्या मोठी असून लोकांना योग्य वेळी संस्था मदत करत आहे. ग्राम पंचायत पातळीवर संस्थेस नेहमी सहकार्य राहील. 
सुनील पाटील, उपसरपंच लोणविरे. 


Post a comment

0 Comments