तीन महिने मोफत तांदूळ वाटप केले जाणार


तीन महिने मोफत तांदूळ वाटप केले जाणार
अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ; अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई :  राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जुन महिन्याचे धान्य देण्याचा आपण दि. 19 मार्चला निर्णय घेतला होता. दरम्यान केंद्रशासनाकडून दि. 30 मार्च 2020 रोजी एप्रिल ते जुन 2020 दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती 5 किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची अधिकृत  सूचना प्राप्त झाली आहे. तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदुळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानांमध्ये साठवणुक करणे जिकीरीचे होईल ही बाब शिधा वाटप दुकानदार संघटनांकडून शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली तसेच केंद्रसरकारने 30 मार्च रोजी मोफत तांदुळ देण्याच्या निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसांत धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा असल्यामुळे त्या-त्या महिन्यामध्ये, त्या महिन्याचे धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची केंद्रसरकारची  सूचना आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला त्याने नियमित अन्न धान्याची खरेदी केल्यानंतर, प्रती व्यक्ती 5 किलो तांदुळ त्या-त्या महिन्यात मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कालच राज्यभरातील 400 व्हाटसअॅप ग्रुप च्या माध्यमातून सर्व रेशन धान्य दुकानदारांना याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. व सामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे आज राज्यातील 2 लाखाहून अधिक शिधापत्रिका धारकांनी नियमित धान्य घेतले आहे. तसेच सर्व रेशन धान्य दुकानांमध्ये आवश्यक धान्य पुरवठा करण्यात येत असून नियमित धान्य खरेदीनंतर शिधापत्रिका धारकांना लवकरच मोफत तांदळाचे वाटप केले जाईल.
सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्यादराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured