Type Here to Get Search Results !

संपादकीय : सामाजिक समता व न्यायाचा रक्षक मराठा राजा : छत्रपती शाहू महाराज


संपादकीय : सामाजिक समता व न्यायाचा रक्षक मराठा राजा : छत्रपती शाहू महाराज
सिद्धार्थ गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर व छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर भारतीय माणसांच्या समाज जीवनात सामाजिक समतेची व न्यायाची बीजे पेरून त्यांचं संवर्धन व रक्षण करणारा नीतिमान राजा म्हणून छत्रपती शाहू महाराज यांचा आवर्जून उल्लेख भारताच्या इतिहासामध्ये केला जातो, अशा मानवतावादी व समतावादी मराठा राजांच्या 143 व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्व समता व न्याय प्रिय भारतीयांच्या वतीने विनम्र अभिवादन....!
जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे व राधाबाई यांच्या कुटुंबात कागल येथे 26 जून 1874 मध्ये जन्म झालेल्या शाहू महाराजांना कोल्हापूरचे चौथे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले होते. लहान वयातच संस्थानाचा राज्यकारभार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. संस्थानाचा राजा म्हणून राज्यकारभार करत असताना त्यांनी आपल्या संस्थानातील मानवी समाज व्यवस्थेचे अतिशय बारीक निरिक्षण व अभ्यास केला होता. यावेळी त्यांना संस्थानात अनेक प्रकारचे चांगले-वाईट अनुभव आले. या अनुभवातून त्यांच्या लक्षात आले की, आपल्या संस्थानामधील समाजात भयानक सामाजिक विषमता, शोषण व अज्ञान प्रचलित आहे. वेदोक्त प्रकरणातून त्यांच्या असे लक्षात आले की माझ्यासारख्या राजाला संस्थानातील ब्राह्मण शूद्र समजून तुच्छ लेखत असतील तर, बाकीच्या सर्वसामान्य बहुजन, व दलित समाजा बरोबर त्यांचे वर्तन कसे असेल...? म्हणून त्यांनी संस्थानाच्या राज्यकारभारातील 50% ब्राह्मणांना कमी करून, ती पदे सर्वसामान्य बहुजनांच्या मधून भरली व भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अठरापगड बहुजन व दलित जातींना 50% आरक्षण देऊन नोकरी, राजकारभार, धार्मिक कार्य ई. क्षेत्रात सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. समाजातील अस्पृश्यता व जातिभेद नष्ट व्हावा म्हणून त्यांनी कांबळे नावाच्या एका दलिताला हॉटेल घालून दिले. एवढेच नाही, तर स्वतः संस्थानातील इतर ब्राह्मण व उच्चवर्णीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते त्या हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी जात होते. शिक्षणाशिवाय बहुजन व दलित समाजाचा उद्धार होणे, असंभव आहे. म्हणून त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत सुरू केले. एवढेच नाही, तर एखाद्या पालकाने आपल्या मुलाला शाळेत पाठवले नाही, तर प्रत्येक दिवसाला एक रुपया दंड आकारण्याची तरतूद केली. शिक्षणातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, म्हणून सर्व जातींच्या विद्यार्थ्यासाठी एकत्र शिक्षण घेण्याची व्यवस्था केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळावी, म्हणून त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय केली. समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी रोटी-बेटी व्यवहार झाला पाहिजे, म्हणून, आपल्या एका बहिणीचा अंतरजातीय विवाह करून दिला. एवढेच नाही तर कायदेशीर विधवां पुनर्विवाहस मान्यता दिली. शेतकरी हा संपूर्ण मानव समाजाचा पोषण करता आहे, हे ओळखून त्या च्या शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी आपल्या संस्थानात राधानगरी सारखी अनेक धरणे व तलाव बांधले. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साधन-सुविधा पुरवण्याची व्यवस्था केली. समाजातील विषमता, दलितांचे व अस्पृश्यांचे शोषण व त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार संपवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे एक उमलते व्यक्तिमत्व दलितांच्या उद्धारासाठी धडपडत आहे, याची जाणीव झाल्यावर त्यांनी आवर्जून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शोध घेऊन शिक्षणासाठी व समाजकार्यासाठी त्यांना आर्थिक मदत करून त्यांचे मनापासून कौतुक केले. एवढेच नाही तर जिवंत असेपर्यंत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाठबळ दिले. एका मराठ्यांच्या दिलदार महाराजाने मुंबई सारख्या ठिकाणी स्वतः जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची भेट घेऊन कौतुक केले. त्यांच्या पत्नी रमाबाई यांना आपली बहीण मानून साडीचोळीची भेट दिली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजामध्ये समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी अर्पण केले. त्यांच्यानंतर मात्र राजकारणात व समाजात मराठा जातीचे अनेक रथी-महारथी झाले, होत आहेत, पण त्यांनी अंतकरणापासून कधी ही सामाजिक समतेचा व न्यायाचा पुरस्कार केलेला दिसत नाही. या सर्वांना खोटा जातीय अभिमान, अज्ञान, अंधश्रद्धा, स्वार्थ, यांनी पछाडलेले असल्यामुळे,  मानवी समाजात समता प्रस्थापित करण्याची त्यांची अजिबात मानसिकता नाही. हीच मंडळी एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे व छत्रपती शाहू महाराज यांचे नाव घेऊन त्यांचे वारसदार असल्याचे अभिमानाने सांगतात, त्यांचा जयंती दिवशी जय जयकार करतात, पण वास्तवात मात्र समाजात जाती-भेद, धर्म-भेद, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, दहशतवाद चोऱ्या, अन्याय व अत्याचार यांचे बेंबीच्या देठापासून समर्थन करतात, तसेच आंतरजातीय विवाह, आंतरजातीय प्रेमविवाह, समता न्याय, अधिकार व मानवी मूल्ये यांना कडाडून विरोध करतात. खोट्या धर्मवादी, दैववादी व जातीयवादी कल्पना उराशी बाळगून, माणसातील माणुसकीला पायदळी तूडवतात. या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा, कार्याचा व आचारांचा बारकाईने व विचारपूर्वक अभ्यास केला, तर निश्चितपणे भारतीय समाजात समता,न्याय व बंधुता या मानवी मूल्यांची जोपासना होऊन आदर्श समाजाची निर्मिती करण्यास योगदान देतील. अशी तीव्र अपेक्षा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त व्यक्त करतो.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies