राज्यातील धर्मादाय खाजगी रुग्णालयांसंबंधी आढावा बैठक

 


 राज्यातील धर्मादाय खाजगी रुग्णालयांसंबंधी आढावा बैठकमुंबई दि.  28 - कोरोना महामारी काळात राज्यातील गोरगरीब रुग्णांवर मोफत आणि अर्ध्या खर्चात उपचार करुन त्यांना दिलासा देणेबाबत राज्य शासनाने निदेशित केलेले असतानासुध्दा अनेक धर्मादाय खाजगी रुग्णालये अशा रुग्णांना दाखल करुन घेत नाहीत, वाढीव उपचार खर्च आकारत आहेत, ही अतिशय गंभीर बाब असून नियमांचे होणारे उल्लंघन तसेच गोरगरीबांच्या आरोग्य उपचाराकरिताची महात्मा फुले जन आरोग्य योजना आणखी सक्षमपणे राबविण्यासाठीच्या योजना, या संदर्भातील सुस्पष्ट अहवाल विधी व न्याय विभागाने व धर्मादाय आयुक्त यांनी येत्या आठ दिवसाच्या आत सादर करावा असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. 
यासंदर्भात आवश्यकता वाटल्यास आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात योजनेच्या आणखी प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी शासनास निदेश दिले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. 
राज्यातील धर्मादाय खाजगी रुग्णालयांसंबंधी आढावा बैठक आज विधानभवन, मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.  बैठकीस धर्मादाय आयुक्त, आर.एन.जोशी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. सुधाकर शिंदे, विधी व न्याय विभागाचे सह सचिव नि.वि.जीवणे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. मो.द.गाडे, बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य), देविदास क्षीरसागर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव मेघना तळेकर, अवर सचिव, सायली कांबळी व पूनम ढगे यावेळी उपस्थित होते. 
वार्षिक उत्पन्न 85000 रुपयांपेक्षा  अधिक नसेल अशा निर्धन व्यक्ती आणि वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार पेक्षा अधिक नसेल अशी समाजातील दुर्बल घटकातील व्यक्ती यांच्यासाठी उपरोक्त योजनेंतर्गत उपचार देणे धर्मादाय खाजगी रुग्णालयांना बंधनकारक आहे.  मात्र अशा प्रवर्गातील अनेक रुग्णांना बऱ्याचदा रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नाही.  तसेच त्यांच्याकडून वाढीव दर आकारला जातो.  महाराष्ट्रात असे एकूण 435 धर्मादाय रुग्णालये आहेत.  या संदर्भात अन्य त्रयस्थाने केलेली तक्रार देखील ग्राहय धरण्यात यावी, रुग्णालयाच्या विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य प्रतिष्ठित व्यक्तींची समिती स्थापन करुन त्यामार्फत अशा रुग्णालयांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे, गोरगरीब रुग्णांसाठी उपलब्ध खाटा व रुग्णालयांची नावे यांचा अद्ययावत माहिती फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे तसेच कोणालाही सहज समजेल व हाताळता येईल, नाव नोंदवता येईल अशा मोबाईल ॲपची निर्मिती करणे आदी महत्त्वाच्या सूचना यावेळी याबैठकीत मांडण्यात आल्या.
 रुग्णांना दाखल करुन न घेणे ही अतिशय गंभीर बाब असल्याने यासंदर्भात अशा रुग्णालयांच्या विश्वस्त अथवा कार्यकारी मंडळाच्या विरुध्द देखील कडक कारवाई केली जावी, केवळ व्यवस्थापकाला पुढे करणे योग्य नाही या मुद्याकडेही लक्ष वेधण्यात येऊन त्याबाबतची उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. 
गोरगरीब जनतेसाठी अस्तित्वात असलेल्या योजनेची व अधिनियमातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासन स्तरावरुन योग्य ते नियंत्रण ठेवण्याबाबत विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या स्तरावरुन निदेशित करण्यात आले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured