Type Here to Get Search Results !

शासकीय सेवेतल्या मायबापांनो आपले दोन पगार, पेन्शन दान देत संकट विमोचक बना ; सादिक खाटीक यांचे आवाहन


 


शासकीय सेवेतल्या मायबापांनो आपले दोन पगार, पेन्शन दान देत संकट विमोचक बना ; सादिक खाटीक यांचे आवाहन
माणदेश एक्सप्रेस टीम 



आटपाडी/प्रतिनिधी : कोरोना महामारी आणि भयंकर अतिवृष्टीच्या दणक्याने मोडून पडलेल्या जनता जनार्दन आणि शेतकरी राजाला सावरण्यासाठी सर्वच संवर्गातील अधिकारी, कर्मचारी आणि पेन्शन धारक मायबाप यांनी आपले दोन पगार शासनास  देवून मोठे पुण्याईचे काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी राज्यातल्या अधिकारी,कर्मचारी पेन्शनधारक बंधू-भगिनी, मायबापांना केले आहे.



राज्यातल्या अनेक जिल्ह्यात झालेल्या भयंकर अतिवृष्टीने कोट्यावधी लोकांना मोठी झळ बसली आहे. आधीच अर्धमेला असलेल्या शेतकऱ्यांचे तर पुरते कंबरडे मोडून पडले आहे. लाखो हेक्टर शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. वाड्या, वस्त्या, गावोगावचे रस्ते, पुल उध्वस्त झालेच परंतू असंख्य ताली, पाझर तलाव फुटल्याने शेकडो विहीरी मुजून गेल्या आहेत, शेत जमीनीतील माती प्रचंड प्रमाणात वाहून गेल्याने या जमीनी पूर्ववत करण्यासाठी लाखो रुपये खर्ची पडणार आहे.  डाळींब, द्राक्ष बागांसह शेता शिवारातली पिके, चारा, उसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीवितहानी बरोबर शेकडो घरांच्या पडझडीने सर्वत्र दैना उडाली आहे. सरासरीच्या दुप्पट, तिप्पट पडलेल्या पावसाने सर्वांनाच भयभीत केले होते. या अतिवृष्टीने झालेले नुकसान हे हजारो कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानी बद्दल हेक्टरी ५० हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये, फुटलेल्या, बुजलेल्या ताली-विहीरीसाठी प्रत्येकी १ लाख रूपये द्यावे अशी मागणी आहे. तसेच घरांच्या झालेल्या पडझडी, जीवीतहानी साठी ही मोठी रक्कम शासनाला द्यावी लागणार आहे.


 



गेल्या ९ महिन्यापासून जगावर घोंगावत असलेल्या कोरोना महामारीच्या संकटाने लाखोंचे जीव घेतले आहेतच. तथापि कोट्यावधींना या आजाराच्या काळात हजारो रुपयांना मुकावे लागले आहे. जनजीवन, व्यापार, उद्योग सर्व काही, अनेक महिने ठप्प झाल्याने जागतिक स्तरावर, देशस्तरावर, राज्यस्तरावर महाभयानक आर्थिक संकट ओढवले आहे. मानव निर्मिती पासूनचे सर्वात मोठे संकट म्हणजे सध्या चालू असलेली कोरोना महामारी. देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व गावा गावांमध्ये कोरोनाच्या संसर्गाने अनेकांना हवालदिल केले आहे. जगात एवढे विज्ञान पुढे गेले असले तरी गत नऊ महिन्यांमध्ये या आजारावर अद्याप खालच्या स्तरापर्यत लस उपलब्ध झालेली नाही. सर्व शास्त्रज्ञ यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी सरकारी यंत्रणा, स्थानिक यंत्रणा व निधी अपुरा पडत आहे. अशा प्रसंगी ज्यांची आर्थिक स्थिती योग्य व चांगली आहे अशा सर्व लोकांनी या महामारीत आपल्या स्वेच्छेने काही पैसा योग्य कारणी लावणे गरजेचे आहे. 



शासनाचे मिळकतीचे मार्ग मंदावले असून खर्च मात्र वाढला आहे. सध्या सरकारच्या एकूण उत्पन्नातील सर्वात मोठा खर्च अधिकारी-कर्मचारी यांचे पगारावर व पेन्शनवर करावा लागतो. शासनाचे अधिकारी-कर्मचारी हे संघटित कर्मचारी आहेत. बरेच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना शासन घरी बसून किंवा कमी काम करून पगार देत होते. गेली काही महिने बरेच कर्मचारी, अधिकारी यांना घरी बसून किंवा कमी काम करून पूर्ण दाम दिला गेला. शासनाने मार्च महिन्याचा अर्धा पगार कपात केला होता तोही नंतर अदा केला आह.  या पार्श्वभूमीवर काहींचे पगारही अद्याप अदा झाले नसल्याचे चित्र असून सध्या रोजंदारीतील मंडळी, संघटित व असंघटीत क्षेत्रातील कामगार रोजगारापासून मुकले आहेत. 



अशातच त्यांच्या घरातील लोकांना कोरोना झाल्यास फार दयनीय अवस्था होत आहे. त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. या महामारीत गरजू लोकांना आवश्यक ती मदत करणे योग्य आहे. यामध्ये कोरोना संसर्ग झालेल्या लोकांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात. अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्यांनाही मदतीचा हात मिळावा अशी भावना आहे. प्रत्येक तालुक्यात शासनाचे पूर्ण वेळ अधिकारी, कर्मचारी पेन्शनधारक मोठ्या संख्येने असून पैकी अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यानी या कोरोना महामारीच्या संकटात मोठ्या हिंमतीने लक्षवेधी काम केले आहे. डॉक्टर, अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस, होमगार्ड, स्वच्छता कर्मचारी, अंगणवाडी सेविका वगैरे हजारोनी आपली अमुल्य सेवा जीव झोकून देवून दिली आहे. तथापि हजारो अधिकारी कर्मचारी यांनी कमी काम करून अथवा घरी बसून मिळालेल्या काही पगार-पेन्शन पैकी दोन महिन्याचे वेतन, पेन्शन शासनाला दान देऊन या प्रचंड संकटात हतबल झालेल्या जनता जनार्दन आणि मोडकळीस आलेल्या शेतकरी राजाला उभे करण्यासाठी शासनाच्या पाठीशी मायबाप म्हणून उभे रहावे. असे माझ्या सारख्याला वाटते असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी, प्रत्येक तालुक्यात सर्व संवर्गातील अधिकारी ,कर्मचारी व पेन्शनधारक यांची संख्या पाहिली तर एक हजार ते अडीच हजार या दरम्यान असून त्यापैकी कमी काम करून अथवा घरी बसून पगार घेतलेल्या सर्व संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांनी तसेच पेन्शनधारकांनी प्रत्येकी दोन महिन्याचे वेतन व पेन्शन या कामासाठी दिल्यास सत्कर्मच होईल. 



कोरोना महामारीच्या काळातही ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून नियमित सेवा बजावली अशा अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचे वेतन त्यांना शक्य आणि योग्य वाटल्यास शासनास दान दिल्यास त्यांचा ही या सत्कर्मात मोठा हातभार लाभू शकेल. प्रत्येक तालुक्यातील कमी काम करून अथवा घरी बसून पगार घेतलेल्या अशा अंदाजे १५०० अधिकारी,कर्मचारी, पेन्शनधारकांचे सरासरी मासीक वेतन ४०००० गृहीत धरले तर प्रत्येक तालुक्यातून दोन वेतन, पेन्शन दानातून सरासरी १२ कोटी रुपये प्रमाणे राज्यातले ३५३ तालुक्यातून सुमारे ४००० कोटी रुपये शासनाकडे जमा होतील. याशिवाय राज्यातल्या खाजगी कंपन्या, उद्योग, व्यवसायातील अधिकारी, कर्मचारी यांनी किमान एक वेतन आणि गावोगावच्या सर्वच क्षेत्रातल्या मोठ्या धनिक मंडळीनी यथाशक्ती दान जमा केल्यास त्यातूनही शेकडो कोटी शासनाकडे जमा होतील. आणि या सर्व पैशाचा कष्टकरी,शेतकरी, नागरीक आणि रुग्णांना उभारण्यासाठी सर्वतोपरी उपयोग होवू शकेल,असे ही त्यांनी स्पष्ट केले.



सांगली जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांतील अधिकारी कर्मचारी, पेन्शनधारक, बंधू-भगिनी, मायबाप यांनी ही पगार पेन्शन दान देण्याची भावना उचलून धरून सत्वर अंमलात आणत राज्यात नवा आदर्श निर्माण करावा असेही आवाहन शेवटी सादिक खाटीक यांनी केले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies