कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण - जितेंद्र डुडी ; प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला ४ ऑक्सिजन सिलेंडर

कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण - जितेंद्र डुडी ; प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला ४ ऑक्सिजन सिलेंडर


 


कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण - जितेंद्र डुडी ; प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला ४ ऑक्सिजन सिलेंडर
माणदेश एक्सप्रेस टीमसांगली : कोरोनाला हरविण्यासाठी मागील सहा-सात महिन्यापासून लढा देत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या पुरविण्यात येऊन त्यांचे बळकटीकरण करण्यासाठी मोहिम सुरू केली आहे. तसेच सद्यस्थितीत कोरोनावर व्हॅक्सीन नसल्यामुळे मास्क हीच व्हॅक्सीन समजून मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्हा परिषद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राना कोविड-19 उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे आदि उपस्थित होते.श्री. डुडी म्हणाले, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना दोन ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले होते. आता आणखी 248 ऑक्सिजन सिलेंडर आले असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला ४ सिलेंडर देण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन थेरपी घेऊ शकतो. ज्या रूग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता आहे ते रूग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रातूनच संदर्भित केले जातील. रूग्णांना आपल्या गावातच उपचार मिळू लागल्याने ते तिथे जाऊन उपचार घेत आहेत त्यामुळे लोकांमधील भीतीचे वातावरणही कमी झाले आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधेही प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आली आहेत. जिथे जिथे गरज भासेल तिथे आणखी औषधांचा पुरवठा करण्यात येईल. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून ते कोरोना रूग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात व्यवस्थितपणे उपचार करीत आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रात 13 सप्टेंबर पासून ही मोहिम सुरू करण्यात आली असून आत्तापर्यंत 500 लोकांना लाभ दिला आहे. यामध्ये 40 टक्के रूग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर बरे होऊन घरी गेले तर 60 टक्के रूग्णांना स्थिर करून पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रीटमेंट यावर भर देऊन रूग्ण लवकर शोधून उपचाराखाली आणल्यामुळे रूग्ण संख्या कमी होत आहे. तसेच ग्रामीण भागातील रूग्ण हॉस्पीटलमध्ये जाण्यासाठी घाबरत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन सिलेंडर व आवश्यक औषधे दिल्यामुळे रूग्ण आता स्वत: बाहेर पडून प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. याचा फायदा कोरानाची साखळी तोडण्यासाठी होत आहे.  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 5 ऑक्टोबर पासून कोरोना सुरक्षित ग्राम ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. या मोहिमेव्दारे कोरोना मुक्तीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ज्या गावामध्ये चांगले काम होईल अशी प्रत्येक तालुक्यातील तीन गावे निवडून त्यांना प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी या मोहिमेत लोकप्रतिनिधी व इतर सर्वांनी सहभाग द्यावा, असे आवाहनही यावेळी श्री. डुडी यांनी  केले.


 


माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत २१ लाखाहून अधिक लोकांची तपासणी
यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती सभापती आशा पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी पत्रकारांशी संवाद साधून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम व कोरोना सुरक्षित ग्राम मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले, ग्रामीण व नगरपरिषदा क्षेत्रात 5 लाख 23 हजार 590 कुटुंबामध्ये एकूण 23 लाख 56 हजार 153 इतकी लोकसंख्या आहे. या कुटुंबाची तपासणी करण्याकरिता माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत 1 हजार 572 आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 4 लाख 54 हजार 927 कुटुंबांतील 21 लाख 14 हजार 135 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये को-मॉर्बीड व्यक्तींची संख्या 1 लाख 15 हजार 675 आहे. सारी / आयएलआय संशयीत व्यक्ती 8 हजार 610 आहेत. यापैकी 8 हजार 532 व्यक्तींना संदर्भ सेवा सुचविलेल्या आहेत. 11 हजार 551 व्यक्तींच्या आरटीपीसीआर / रॅपिड ॲन्टीजन टेस्ट केलेल्या असून 2 हजार 834 व्यक्ती पॉझिटीव्ह आहेत.राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेनुसार कोरोनाविषयक जनसामान्यामध्ये असलेली भिती दुर करणे, सर्दी, खोकला, ताप, श्वसनास त्रास, धाप लागणे, रस-गंध नसणे, इत्यादी कोरोनाची लक्षणे माहित होणे, कोरोना नियंत्रण मोहिमेमध्ये जनतेचा सहभाग घेणे व जनतेच्या सहभागातून कोरोना पासून सुरक्षित व्यक्ती, गाव, तालुका, जिल्हा ही संकल्पना उतरण्यासाठी कोरोना सुरक्षित ग्राम ही मोहिम दिनांक 5 ते 31 ऑक्टोबर 2020 अखेर राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून यामध्ये तलाठी सहअध्यक्ष, ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी हे सचिव, पोलीस पाटील, आरोग्य सेवक,शिक्षक, कृषि सहाय्यक, अंगणवाडी सेविका हे सदस्य म्हणून आणि महिला प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी हे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काम पाहतील. कोरोना मुक्त गाव मोहिमेसाठी विविध निकष ठरवून दिले असल्याचे यावेळी सांगितले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments