अर्णब गोस्वामींसाठी उपोषण करणारे आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात 


 


अर्णब गोस्वामींसाठी उपोषण करणारे आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात 


 मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपा आमदार  राम कदम हे मंत्रालयाच्या गेटसमोर फुटपाथवर आंदोलनाला बसले, यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाराष्ट्र सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. त्यानंतर काही वेळांनी पोलिसांनी आमदार राम कदम यांना ताब्यात घेतले.


 
याबाबत आमदार राम कदम म्हणाले की, महाराष्ट्र सरकारनं पुकारलेल्या अघोषित आणीबाणीविरोधात लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं आहे त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या घटकाविरोधात अघोषित आणीबाणी पुकारता येणार नाही. त्यामुळे सरकारविरोधात हे लाक्षणिक उपोषण आहे. अर्णब गोस्वामींसोबत संपूर्ण देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करतोय असं त्यांनी सांगितले.


 तसेच ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली त्यांना निलंबित करावं मी पोलिसांचा आदर करतो, पण कायद्यानुसार अशाप्रकारे अर्णब गोस्वामींसारख्या पत्रकाराला मारहाण करणं योग्य नाही, त्यामुळे या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी केली, मात्र हे सरकार धुतराष्ट्राचं सरकार आहे, आंधळे आणि बहिरे सरकार असल्याने त्याची किंमत मोजावी लागेल. या सरकारला वठणीवर आणण्याचं काम जनता करेल अशी टीका राम कदम यांनी केली.
दरम्यान, हे लाक्षणिक उपोषण अर्णब गोस्वामींवर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी लोकांचे प्रतिनिधित्व म्हणून करत आहोत, महाविकास आघाडी सरकारची जुलमी हिटलरशाही चालणार नाही, त्यांना अर्णब गोस्वामींसह सर्व पत्रकारांची माफी मागावी लागेल. मी विधानसभेचा सदस्य आहे, जर रस्त्यावर मी आंदोलन करत असेल तर सरकारने मला बोलावून माझं म्हणणं ऐकलं पाहिजे, नाहीतर हे सरकार कोणत्या कातडीचे आहे कळेल असा टोलाही राम कदम यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured