भाजपच्या सत्ताकाळात महावितरणाचा तोटा : मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

 

मुंबई : भाजपच्या सत्ताकाळात  वीजबिलाची थकबाकी म्हणजेच महावितरणचा तोटा ३६,९९२ एवढ्या कोटींनी कसा वाढला, याची चौकशी करण्याचे आदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचना केल्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.


२०१४ साली महाराष्ट्रात १४,१५४.५० कोटी रुपये वीज बिलाची थकबाकी होती. मात्र हा आकडा पाच वर्षांत ३६,९९२ एवढ्या कोटींनी वाढला. परिणामी वीज बिलाची थकबाकी ५१,१४६.५० कोटींची झाली. या बातमीचा उल्लेख मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः केला. जर अशी परिस्थिती असेल, तर हा तोटा नेमका कशामुळे झाला? याला कोण जबाबदार आहे? यावर उपाय काय? यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत असेही, त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर राऊत यांनी आपल्या विभागाच्या वतीने वेगवेगळे प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणले जात आहेत, असे स्पष्ट केले. झालेले नुकसान मोठे आहे. त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. ज्यांच्यामुळे हे नुकसान झाले, तोटा प्रचंड वाढला, अशा दोषींवर कारवाई केली पाहिजे असा सूर मंत्रिमंडळ बैठकीत उमटला. 


त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे सांगितले. आपण आदेश द्या, आम्ही चौकशी लावतो, असे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर या संपूर्ण नुकसानीची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे ठरले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post