दिल्लीत भयानक परिस्थिती ; कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला ५ लाखांचा टप्पा : केजरीवाल घेणार मोठा निर्णय

दिल्लीत भयानक परिस्थिती ; कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला ५ लाखांचा टप्पा : केजरीवाल घेणार मोठा निर्णय

 नवी दिल्ली : देशाच्या राजधानीमध्ये कोरोनाचा धोका वाढलेला दिसून येत आहे. दिल्लीतील भयानक परिस्थिती पाहता केजरीवाल मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधीच दिल्लीमध्ये मिनी लॉकडाउनची चर्चा आहे. पण त्यापेक्षाही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आप सरकार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या १० दिवसात दिल्लीत एकूण ६० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. 

दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीने नवा रेकॉर्ड केला आहे. एका दिवसात तब्बल १३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ७,४८६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिल्लीत आतापर्यंतच्या रुग्णसंख्येने ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत: जीटीबी रुग्णालयला भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. जीटीबी रुग्णालयात २३२ आयसीयू बेड्स वाढविण्यास मंजुरी देण्यात आल्याचं केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय दिल्लीतील धर्मशाळांमध्ये ६६३ आयसीयू बेड्स वाढविण्यात येणार आहेत. बाजार पेठा बंद करण्याबद्दल बोलत असताना केजरीवाल यांनी गरज भासल्यास काही बाजारपेठा बंद ठेवाव्या लागतील असं स्पष्ट केलं आहे. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments