आटपाडी, तासगाव व जत येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी :  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


 


 


सांगली : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये व किमान आधाभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतूने राज्यात प्रथमच खरीप हंगामामध्ये उत्पादीत झालेल्या भरडधान्यासाठी (मका व ज्वारी) खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता व त्या ठिकाणी मका/ज्वारी या भरडधान्याची खरेदी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा मार्केटींग अधिकारी सांगली यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव, जत व आटपाडी या ठिकाणी भरडधान्य (मका/ज्वारी) खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजूरी दिली आहे. ही केंद्रे दि. 1 नोव्हेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.


 


 


 मका व ज्वारी शेतमालासाठी तासगाव, जत व आटपाडी येथे जिल्हा मार्केटींग अधिकारी सांगली दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटींग फेडरेशन लि. मुंबई यांनी नियुक्त केलेले उप अभिकर्ता (सबएजंट) पुढीलप्रमाणे. तासगाव - ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सहकारी संघ तासगाव, जत - विष्णू आण्णा सहकारी खरेदी विक्री संघ सांगली, आटपाडी - कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी. संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रास त्या तालुक्यातील सर्व गावे जोडण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये भरडधान्य खरेदी केंद्र उघडण्यात आलेली नाहीत, त्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी त्यांना जवळ असलेल्या खरेदी केंद्रासाठी नोंदणी करून त्या ठिकाणी भरडधान्याची विक्री करावी. आधारभूत किंमत मका 1850 रूपये, ज्वारी (मालदांडी) 2640 रूपये व ज्वारी (संकरीत) 2620 रूपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आलेली आहे.


 


  शेतकऱ्यांकडील भरडधान्य खरेदी करण्यासाठी ऑनलाईन खरेदी पध्दत सुरू करण्यात आलेली असल्यामुळे त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी आधार क्रमांक, बचत बँक खाते क्रमांकासह होणे आवश्यक आहे. पणन हंगाम 2020-21 करीता NeML NCDEX Group Company यांचे प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे त्या नोंदी PFMS (Public Fund Management System) करणे अनिवार्य आहे. यासाठी संबंधित शेतकरी यांनी संगणकीकृत 7/12 उतारा (ज्यावर खरीप हंगाम 2020-21 मध्ये मका/ज्वारी या पिकांची नोंद असणे आवश्यक), खाते उतारा (नमुना 8अ), आधारकार्ड, बँक खाते पासबुक (सदर बँक खात्यास आधार लिंक असणे आवश्यक) या कागदपत्रांसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.


 


  कृषि विभागाच्या अहवालानुसार सांगली जिल्ह्याची मका पिकाखालील 42 हजार 543 हेक्टर व ज्वारी पीकाखालील 49 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. संबंधित शेतकऱ्याचे मका/ज्वारी पिकाखालील क्षेत्र व सरासरी उत्पादकता याचा विचार करूनच खरेदी केली जाईल. खरेदी केंद्रावर केवळ खरीप हंगाम 2020-21 मधील उत्पादित मका/ज्वारी खरेदी केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत गतवर्षीचे जुने भरडधान्य खरेदी केले जाणार नाही. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रावर आरोग्य विषयक सुरक्षिततेबाबत (Social Distancing, मास्क वापरणे इ.) आवश्यक काळजी घ्यावी. चौकशी व अधिक माहितीसाठी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालय, सांगली, जिल्हा मार्केटींग अधिकारी सांगली, ॲड. आर. आर पाटील सह. खरेदी विक्री संघ तासगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी, विष्णू आण्णा सह. खरेदी विक्री संघ लि. जत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured