अहमदाबादमध्ये संचारबंदी ; गुजरात सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला

अहमदाबादमध्ये संचारबंदी ; गुजरात सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला

 अहमदाबाद : दिल्लीनंतर आता अहमदाबादमध्येही  कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये ५७ तासांच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या घोषणेनंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी लोकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली आहे. अहमदाबाद प्रशासनाने आज रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदीची घोषणा केली आहे. यादरम्यान, केवळ मेडिकल आणि दुधाची दुकानेच सुरू राहणार आहेत.


गुजरामधील आयएसएस अधिकारी डॉ. राजीव कुमार गुप्ता यांनी ट्विट करून सांगितले की, रात्री उशिरा कोरोनाच्या स्थितीची समीक्षा करण्यात आली. त्यानंतर आज रात्री ९ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ६.०० वाजेपर्यंत अहमदाबाद शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधील केवळ दूध आणि औषध विक्री करणारी दुकानेच सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
तसेच या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये लागू झालेली संचारबंदी आणि वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने संपूर्ण राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. अहमदाबादमधील या संचारबंदीदरम्यान, केवळ आवश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू राहतील. याशिवाय विजय रुपानी सरकारने अहमदाबादसाठी ३०० डॉक्टर, ३०० वैद्यकीय विद्यार्थी आणि २० अतिरिक्त अॅाम्ब्युलन्स तैनात केल्या आहेत. अहमदाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या वेगाने वाढत आहेत.Post a comment

0 Comments