‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ : शिवसेना 


 


 


‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ : शिवसेना मुंबई : ‘‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,’’ अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे. त्याला शिवसेनेने खणखणीत उत्तर दिले आहे."कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी एक लक्षात घ्यावे, सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल," असा इशारा शिवसेनेने दिला आहे.


 सूर्याच्या ढळढळीत प्रकाशझोतात बेळगावचा लढा सुरू आहे. त्याच सूर्यप्रकाशात कानडी पोलीस ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱया मराठी बांधवांवर अत्याचार करीत आहेत व रात्रीच्या अंधारात, चंद्राच्या शीतल प्रकाशात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवीत असतात. पण तेथील मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद आहे. कर्नाटक सरकारचा 1नोव्हेंबर हा स्थापना दिवस असतो.


 


हा दिवस सीमा भागातील मराठी लोक ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. ही वेळ 20 लाख मराठी बांधवांवर कोणी आणली? भाषावार प्रांतरचना केल्यावर मराठी भाषिकांना त्यांच्या हक्काच्या राज्यात जाण्याचा अधिकार का नाकारला गेला? 20 लाख मराठी भाषिकांचा आक्रोश, किंकाळ्या, सांडलेले रक्त आणि बलिदानाची पर्वा न करता निव्वळ दडपशाही मार्गाने मराठी भावना चिरडून त्यांना कानडी मुलखात कोंबले हा अन्याय नाही का? असा सवाल शिवसेनेने  उपस्थित केला आहे. 


 महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. हा जो कोणी लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होता त्याआधीपासून 20 लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. त्यामुळे आता न्यायालयच काय ते ठरवेल. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured