“सध्याच्या राजवटीत लोकांच्या शेळ्या झाल्या आहेत” : शिवसेना

“सध्याच्या राजवटीत लोकांच्या शेळ्या झाल्या आहेत” : शिवसेना
 “सध्याच्या राजवटीत लोकांच्या शेळ्या झाल्या आहेत” : शिवसेना मुंबई : शिवसेनेकडूनही केंद्रातील भाजपा सरकारच्या कारभारावर सातत्यानं टीका केली जात असून, पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत भाजपाला इशारा दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मोदींनी त्यावर भाष्य केलं होतं. पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानावरून शिवसेनेनं मोदींना सामना अग्रलेखातून लक्ष्य केलं आहे.“मोदी हे ‘मन की बात’मधून आकाशवाणी करतात. म्हणजे त्यांना मनदेखील आहे. मोदी यांनी आता त्यांचे नवे दुःख लोकांसमोर मांडले आहे. दिल्लीतील काही लोक मला सतत टोमणे मारत असतात व माझा अपमान करतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत, असे मोदी यांनी सांगितले आहे हे धक्कादायक आहे. आपल्या पंतप्रधानांचा अपमान कोण करीत आहे? पंतप्रधानांचा अपमान करण्याइतका प्रबळ विरोधी पक्ष विद्यमान राज्यकर्त्यांनी शिल्लक ठेवला आहे काय? काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वास आपण गांभीर्याने घेत नसल्याचे भाजप पुढाऱ्यांनी एका बाजूला सांगायचे व त्याचवेळी राहुल गांधी आमचा अपमान करतात, असे दुसऱ्या तोंडाने बोलायचे हे पांचट विनोदाचे लक्षण आहे. विधायक टीका करणे, सरकारच्या खोटेपणावर बोलणे यास राज्यकर्ते अपमान म्हणत असतील तर लोकशाहीचा अंतकाळ जवळ आला आहे,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.“सध्याच्या राजवटीत लोकांच्या शेळ्या झाल्या आहेत. शेळ्या झालेले एकमेकांना सांगत आहेत की, ‘मेंढपाळाने छान व्यवस्था केली.’ ही व्यवस्था म्हणजेच आनंद, सुख मानण्याची गोष्ट नाही. सरकारला शेळ्यांची व्यवस्था करायची आहे व त्या व्यवस्थेवर शेळ्या खूश असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण इतरांनीही शेळ्या-मेंढ्या व्हावं हा त्यांचा आग्रह चुकीचा आहे. वाघ, लांडगे, हत्ती, सिंह यांनीही शेळ्या-मेंढ्यांसारखे बॅss बॅss करावे व कोणी गर्जना केली तर तो अपमान, ही लोकशाही नाही. यालाच लोकशाही म्हणावे, असा दबाव टाकणाऱ्यांना लोकशाही शिकवायची गरज आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments