Type Here to Get Search Results !

“दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय?” : शिवसेनेचे दरेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर




 “दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय?” : शिवसेनेचे दरेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर 



मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना कोरोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. नागरिकांकडून सूचनांचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर ‘सरकारने लोकांमध्ये दहशतीचे वातावर निर्माण करू नये. जुलमी राजवटीसारखी कृती करू नये,’ अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली होती. दरेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.




“राज्यात कोरोनाची दुसरी लाट धडक मारते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. मुंबई शहरातच हा आकडा हजाराच्या आसपास आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांना समोर येऊन सगळ्यानांच कडू औषधाचा डोस पाजावा लागला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, लोकांनी शिस्त, नियम पाळावेत. राज्यात ‘लॉक डाऊन’ लावायचे की नाही, याचा निर्णय पुढील आठवड्यात घेऊ. ”मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉक डाऊन टाळा”, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अशा प्रसंगी राजकारण न करता सरकार तसेच विरोधकांनी जनतेचे हित सांभाळावे, एकोप्याने काम करावे असे संकेत आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी ‘लॉक डाऊन’बाबत इशारा देताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी वेगळेच टोकाचे विधान केले, ”राज्यात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. जुलमी राजवटीसारखी कृती करू नका.” दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय?,” असा सवाल करत शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला.




“कोरोना संसर्गाबाबत सत्यस्थिती समोर मांडणे याला काय दहशत पसरवणे म्हणायचे? महाराष्ट्रात आढळलेला करोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याची माहिती ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवणे आणखी कठीण असल्याची भीती डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केली. यापूर्वी करोनाच्या अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका असल्याचे डॉ. गुलेरिया सांगत आहेत. करोनावरील लस ही नव्या स्ट्रेनविरोधात कुचकामी आहे, हे जे डॉ. गुलेरिया तळमळीने सांगत आहेत, तो काय दहशत माजविण्याचा प्रकार आहे? ‘एम्स’चे संचालक देशाला गुमराह करीत आहेत, असे महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन ‘एम्स’च्या दारात जोरदार आंदोलन केले पाहिजे. देशाचे आरोग्यमंत्रीच काय, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे उंबरठे झिजवून निषेधाची पत्रे दिली पाहिजेत. पण मुख्यमंत्री बोलत आहेत, लोकांना धोका समजावून सांगत आहेत म्हणून टीका करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह करणे किंवा त्यांना कोरोनाच्या खाईत लोटण्यासारखे आहे,” अशी टीका शिवसेनेनं भाजपावर केली आहे.




 “मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याचे स्वागत विरोधकांनी का करू नये? जनता जेवढी सत्ताधारी पक्षाची असते तेवढी ती विरोधी पक्षांची सुद्धा आहे. लॉक डाऊनमुळे लहान व्यापारी, नोकरदार वर्ग, हातावर पोट आहे अशांचे कंबरडे मोडणार हे नक्की. आर्थिक व्यवस्थाही कोसळणार आहेच. त्यासाठी मार्ग काढावा लागेल व केंद्राने त्याकामी मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला या कामी केंद्राकडून एखादे विशेष आर्थिक पॅकेज मिळायला हवे. असे आर्थिक पॅकेज मिळावे म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनीही मोदी यांच्याकडे तगादा लावला तरी आमची हरकत नाही. राज्यातील विरोधी पक्ष हा काही पाकिस्तानी किंवा अफगाणी वंशाचा नाही. तो याच मातीतला आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा, देवेंद्र फडणवीस, दरेकर, आशिष शेलार वगैरे मंडळींनी दिल्लीतच ठाण मांडून बसावे व राज्याच्या वतीने एक-दोन हजार कोटींच्या पॅकेजसाठी लढत राहावे. राज्यातून देशाला जो मोठा महसूल मिळतो, त्यातला पुरेसा परतावा महाराष्ट्राला मिळाला तर विरोधी पक्षाला सरकारकडून जे करून घ्यायचे आहे, त्याचा मार्ग मोकळा होईल,” असा सल्लाही शिवसेनेनं भाजपा नेत्यांना दिला आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies