Type Here to Get Search Results !

शासकीय व खाजगी लॅबमधील अहवालांचे तुलनात्मक विश्लेषण करून पुढील निर्णय घेणार – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून सतर्क रहावे. तसेच शासकीय व खाजगी लॅबमधील स्वॅब तपासणी अहवालातील तुलनात्मक विश्लेषण करून कोरोना परिस्थितीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हातील कोरोना उपाययोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पल्लोड, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे, अन्न, औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त माधुरी पवार, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. उत्कर्ष दुधेडिया आदी उपस्थित होते.
सुरुवातीलाच मा पालकमंत्र्यांना माहिती देत असताना जिल्हाधिकारी  सुरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोविड टेस्टिंगचे प्रमाण वाढविले असल्याने बऱ्याच दिवसांनंतर पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी जिल्ह्याचा मृत्युदर कमी असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय व खाजगी लॅबमधील स्वॅब तपासणीच्या अहवालात सतत तफावत आढळून येत असून यावर पडताळणी करणे गरजेचे झाले आहे असेही सांगितले.  त्यातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी एकाच वेळी घेण्यात आलेले स्वॅब शासकीय व खाजगी लॅबकडे तपासणीसाठी पाठविणे, खाजगी लॅबमध्ये 28 टक्के अधिक पॉझिटीव्ह अहवाल येत असल्याने त्यातील ठराविक स्वॅबची शासकीय लॅबमध्ये पुन्हा तपासणी करणे आणि दैनंदिन घेण्यात येणारे स्वॅब जिल्हा रुग्णालयाच्या नियंत्रणाखाली मध्यवर्ती ठिकाणी एकत्र करून त्यानंतर विविध लॅब्समध्ये तपासणीसाठी पाठविण्यात यावे, असे तीन पर्याय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीत सांगितले. यावर त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही, इतर शहरांमधील वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे बंधन येऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा नियमित वापर करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे खाजगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या स्वॅब तपासणीतील पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 28 टक्के तर शासकीय लॅबमधील पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 5 टक्के येत असल्याने याबाबत प्रशासनामार्फत पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे रूग्णांमधील हर्डइम्युनिटी तपासण्यासाठी शहरात करण्यात येणाऱ्या ‘सिरो सर्व्हे’चे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लस घेतली असून त्याचा कोणताही विपरीत परिणाम झाला नसल्याचे दिसून आल्याने देण्यात येणारी कोविशिल्ड ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे कोरोना काळात फ्रंटलाईनवर राहून काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी पुढाकार घेऊन लसीकरणाची मोहीम यशस्वी करावी. असे आवाहन पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले आहे.
लसीकरण मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक :   सूरज मांढरे

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 36 हजार 720 उद्दीष्टापैकी 29 हजार 600 लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 29 केंद्र सुरू असून या केंद्रांवर आठवड्यातील पाच दिवस लसीकरण करण्यात येत आहे. 10 मार्च पर्यंत लसीकरणाचा पहिला टप्पा शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मालेगावं येथे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी तेथील धर्मगुरूं तथा मौलवी यांची मदत घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी आरोग्य यंत्रणेला सांगितले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies