“शेतकऱ्यांना देशाचे दुश्मन मानून सरकार लढाईच्या मैदानात” : संजय राऊतमुंबई : दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांना पॉप सिंगर रिहानाने दिलेला पाठिंबा आणि त्यावरून भारतीय सेलिब्रिटीजनी केलेले ट्विट यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक भाष्य केलं आहे.


संजय राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून ही घणाघाती टीका केली आहे. पॉपस्टार रिहाना हिने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी येथील कलाकारांचे कौतुक केलेले चालते. पण लढणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो. 

आता रिहानाच्या समर्थनासाठी जे उभे राहतील त्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जाईल. देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात कमालीचा स्वस्त झाला आहे, पण गाझीपूरच्या सीमेवर प्रत्येक तंबूवर तिरंगा फडकतो आहे. देशभक्तीची गाणी लागली आहेत. सरकारच्या पगडीलाच शेतकऱ्यांनी हात घातला. म्हणजे त्यांनी देशद्रोहच केला! लोकशाही व नीतिमत्तेच्या गप्पा आता फक्त तोंडी लावायला. प्रत्यक्षात दिल्लीच्या दिव्याखाली अंधार आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

’’ पंतप्रधान म्हणतात, ‘‘आंदोलक व शेतकरी यांच्यात एका फोन कॉलचे अंतर आहे!’’ यावर मिस्कील जाट टिकैत म्हणाले, ‘‘मग वेळ कशाला? मला त्यांचा नंबर द्या. मीच फोन करतो!’’ गाझीपूर सीमेवरचा हा खेळ सुरूच आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

26 तारखेच्या संध्याकाळी सरकारने बळाचा वापर करून आंदोलनाची बाजी पलटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भावनाविवश झालेले टिकैत यांना हुंदका फुटला. त्या हुंदक्याने शेतकरी मागे फिरले व ‘म्हारो टिकैत’चे फलक घेऊन गाझीपूरला आले. मेरठ, बागपत, मुझफ्फरपूर, जिंद यासारख्या भागात हजारो ‘जाट पंचायती’ झाल्या व टिकैत यांना पाठिंबा वाढू लागला. तेव्हा बळाचा वापर वाढविण्यासाठी सरकारने काय केले? पोलिसांनी लाकडाऐवजी स्टीलचे आणि लोखंडाचे दंडुके मोठ्या प्रमाणावर तयार करून घेतले. 

लाल किल्ल्यावरील शेतकऱ्यांच्या हाती तलवारी होत्या म्हणून पोलिसांच्या एका पथकाने हाती तलवारी घेतलेले फोटो प्रसिद्ध केले. नंतर पोलिसांनी घोडदळाच्या पलटणी आणल्या. तारांचे कुंपण घातलेच, पण दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सिमेंट लावून त्यावर मोठय़ा खिळ्यांची बिछायत निर्माण केली. हे सर्व शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केले असेल तर हे असले सरकार पाकिस्तान व चीनशी काय लढणार, हा प्रश्न आहेच.

दिल्ली-गाझीपूर हा एक तासाचा प्रवास. तेथे धड पोहोचता येऊ नये म्हणून सरकारने अनेक अडथळे उभे केले. पोलीस व सुरक्षा दलाचे जवान आहेतच. आता फक्त सैन्य आणि हवाई दल काय ते आणायचे बाकी राहिले आहे. हे सर्व कोणाच्या विरोधात? तर आपल्याच शेतकऱ्यांना मागे हटविण्यासाठी. शेतकऱ्यांना देशाचे दुश्मन मानून सरकार लढाईच्या मैदानात उतरले. चीन आणि पाकिस्तानशी चर्चा होते, पण शेतकऱ्यांना ती संधी नाही.

जगभरातून शेतकरी आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देताच पंतप्रधान मोदी यांच्या भक्तांत एकच खळबळ उडाली. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस या उघडपणे शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी उतरताच अक्षय कुमार, कंगना राणावत, सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरपर्यंत सर्व ‘सेलिब्रिटीं’नी अचानक आपली मते समाजमाध्यमांवर व्यक्त केली. 

‘शेतकरी आंदोलन हा आमचा देशांतर्गत विषय आहे त्यात विदेशी हस्तक्षेप नको,’ असा साक्षात्कार या प्रमुख मंडळींना झाला. पण गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी एकाकी झुंज देतोय त्यावर साध्या संवेदनाही या प्रमुख मंडळींनी व्यक्त केल्या नाहीत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पाठिंबा शेतकऱ्यांना मिळू लागताच, सरकारने त्यांच्या विरोधात या ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले. शेतकऱ्यांचा लढा हा माणुसकी व न्याय हक्काचा लढा आहे. जगभरातून अशा प्रत्येक लढय़ास मानवतावादी पाठिंबा देतच असतात. शेतकरी देशात बंडाळी करू इच्छित नाहीत व ते देश तोडायला निघाले नाहीत.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured