पाण्याचा किफायतशीर वापर करून सिंचित क्षेत्र वाढवा – पालकमंत्री सुभाष देसाई

पाण्याचा किफायतशीर वापर करून सिंचित क्षेत्र वाढवा – पालकमंत्री सुभाष देसाई
औरंगाबाद : पाणी ही संपत्ती आहे. पाण्याची नासाडी होऊ नये, त्यासाठी योग्य नियोजन करून सिंचित क्षेत्र वाढविण्यावर भर द्यावा,  अशा सूचना उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज केल्या.
 

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात कालवा सल्लागार समितीची बैठक श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्वश्री आमदार अंबादास दानवे, बाबाजानी दुर्राणी, रमेश बोरनारे, प्रशांत बंब आणि जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के.बी. कुलकर्णी, मुख्य अभियंता दिलीप तवार, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक व समितीचे सदस्य सचिव राजेंद्र काळे, बीड लाभ क्षेत्र विकासचे अधीक्षक अभियंता श्री. निकुडे, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ए. एम. निंभोरे आदींसह मराठवाड्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.
 

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ज्या प्रकल्पातील पाणी आहे, त्याच प्रकल्पाला ते मिळणे आवश्यक आहे, यासाठी महामंडळाने पाठपुरावा करावा. तसेच नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला त्यांना त्वरीत देण्यात यावा, यासाठी श्री. बोरनारे यांनीही पाठपुरावा करावा. कालव्यांची दरवाजे, चाऱ्यांची दुरूस्ती फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. बाष्पीभवनातून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत. पाण्याचा वापर सुनियोजितरित्या सुक्ष्मपद्धतीने योग्यरित्या वापर होण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे. पाण्याच्या अपव्यय होणार नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. महामंडळाद्वारे कालवे, चाऱ्यांची दुरूस्ती करण्यासंदर्भात, उर्वरीत कामांसंदर्भात, निधीबाबत प्रस्ताव द्यावा. त्याचबरोबर कालव्यांच्या दुरूस्तीवर अधिक खर्च होणार नाही यासाठी वितरिकेबाबत डेमोपद्धतीने कार्यवाही करण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना श्री. देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

यावेळी सर्वश्री आमदार श्री. दानवे, दुर्राणी, बंब, बोरनारे आदींनी विविध सूचना केल्या. त्यांच्या सूचनांची दखल घेत श्री. देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले.  त्याचबरोबर पैठण डावा कालव्यावर स्थापन करण्यात आलेल्या पाणी वापर संस्थांच्या प्रवर्तकांनीही काही सूचना सूचविल्या, त्यांच्या सूचनांचीही दखल श्री. देसाई यांनी घेतली.

 

बैठकीत श्री. काळे यांनी जायकवाडी प्रकल्प, पैठण धरणाची वैशिष्ट्ये, रब्बी व उन्हाळी हंगामातील पाणी नियोजन, जायकवाडी प्रकल्पातून प्रथम पाणी आवर्तन मान्यता, नांदूर मधमेश्वर जलद कालवा प्रकल्प आणि त्यांतर्गत मुकणे, भावली, वाकी, भाम येथील उपलब्ध पाणी साठा, निम्न दुधना प्रकल्प आदींबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले. यावेळी श्री. तवार आणि कुलकर्णी यांनीही प्रकल्पांबाबत माहिती सादर केली.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments