एम.आर.आय. व सिटी स्कॅन यंत्रामुळे घाटीच्या अत्याधुनिक सुविधांमध्ये वाढ – पालकमंत्री सुभाष देसाई

एम.आर.आय. व सिटी स्कॅन यंत्रामुळे घाटीच्या अत्याधुनिक सुविधांमध्ये वाढ – पालकमंत्री सुभाष देसाई

 
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे उपचारासाठी केवळ जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातून आणि इतर जिल्ह्यातील रूग्ण येत असतात. येथील उपचार सुविधेत सिटी स्कॅन मशिन व टेस्ला कंपनीच्या एम.आर.आय. यासारख्या अत्याधुनिक यंत्रामुळे येथील उपचार सुविधा अधिक सुसज्ज होण्यास मदत झाली आहे, असे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले.
आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील क्ष-किरण विभागात सिटी स्कॅन व एम.आर. आय. यंत्राचे लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमूख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात उत्कृष्ट सेवा बजावलेल्या कोविड योध्द्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई शेळके, स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) च्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, क्ष-किरण विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. वर्षा शेटे तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
        

श्री. देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याने कोरोना महामारीला थोपवण्यासाठी एकजुटीने सामना केला आहे, त्याला तोड नाही. आरोग्य क्षेत्रातील अनेक अडचणींचा सामना करत आरोग्य क्षेत्रात सर्वांनी जीवाची पर्वा न करता काम केले आहे. त्यामुळे लोकांच्या मनातून कोरोना आजाराची भीती दूर होत खबरदारीची जाणीव निर्माण झाली आहे. कोरोनातून आपण बरे होऊ असा विश्वासही निर्माण झाला तो या कोरोना योद्ध्यांच्या समर्पन भावनेतून काम केल्यामुळेच. कोराना सारख्या महामारीचा वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळामुळेच सामना करता आला त्यामुळे आधुनिक यंत्र, इमारतीबरोबरच पुरेशा मनुष्यबळाची उपलब्धता असावी, अशा सूचना श्री. देसाई यांनी यावेळी केल्या. त्याचबरोबर राज्याला पुढे नेत असतांना जनतेचे आरोग्यही सुदृढ असले पाहिजे त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील उपचार सुविधा उपलब्धतेसाठी अधिकाधिक आर्थिक तरतूदीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
 

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुशल व सक्षम नेतृत्वाखाली आपण कोरोना महामारी विरूद्ध लढा सुरू ठेवत त्यावर मात करून मार्गक्रमण करीत आहोत. तसेच राज्याने कोरोनावरील लस उपलब्ध करून देण्याचा मानही मिळवला आहे, ही अभिमानाची बाब आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी यांनी अविरत परिश्रम घेऊन अनेकांचे प्राण वाचवले. दुर्दैवाने काहींना प्राण गमवावे लागले. ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबियांचे सामाजिक बांधिलकीतून पालकत्व घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले. वैद्यकीय क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा मिळण्यासाठी अमुलाग्र बदल करीत गुंतणूक करायची आहे. त्यासाठी एकुण अर्थसंकल्पाच्या 6 ते 7 टक्के तरतूद करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही श्री. देशमुख म्हणाले. कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील सुविध उपलब्ध असण्याबाबत जाणीव झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अत्याधुनिक मुलभुत सेवा सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी कोरोना उद्भवल्यापासून ते कोरोनाला अटकाव करण्यापर्यंत आरोग्य सेवकांनी बजावलेल्या कार्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगत त्यांचा सन्मान होनं आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी कोरोना काळातील अनुभवांचे चित्रण असलेल्या ‘संघर्षमय अनुभव’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचनही करण्यात आले.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments