Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांनो फळपिक झाला सुरु ; पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हा कृषी अधिकारी बसवराव मास्तोळी यांचे आवाहन



सांगली : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना, (मृग बहार) 2021-22 या योजनेची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई मार्फत जिल्ह्यात करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना भाग घेण्याची अंतिम मुदत द्राक्ष-(क), पेरु, लिंबू व चिकू या फळपिकासाठी 30 जून 2021 आणि डाळींब पिकासाठी 14 जुलै 2021 आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.






पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना, (मृग बहार) योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. ही योजना शासन निर्णयातील अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी लागू राहील. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे.  अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी खातेदारांव्यातिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल (उदा. डाळींब व द्राक्ष). केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहाणार आहे. उत्पादनक्षम अधिसूचित वय डाळींब व द्राक्ष 2 वर्ष, पेरु 3 वर्ष, लिंबू 4 वर्ष, व चिकू 5 वर्ष या पेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षण घेतल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केलेला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत 30 ते 35  टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून 35 टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी 50:50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे.




फळपिकनिहाय विमा संरक्षित रक्कम कंसात विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा, समाविष्ट धोके व विमा संरक्षण कालावधी अनुक्रमे पुढीलप्रमाणे. चिकू – 60 हजार (3 हजार), ज्यादा आद्रता व जास्त पाऊस, 1 जुलै ते 30 सप्टेंबर. द्राक्ष- (क) – 3 लाख 20 हजार (16 हजार), पाऊस, आद्रता व किमान तापमान, 15 जून ते 15 नोव्हेंबर. डाळींब – 1 लाख 30 हजार (6 हजार 500), पावसाचा खंड  15 जुलै ते 15 ऑक्टोबर व जास्त पाऊस 16 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर. लिंबू – 70 हजार (6 हजार 300), कमी पाऊस 15 जून ते 15 जुलै व पावसाचा खंड 16 जुलै ते 15 ऑगस्ट. पेरु – 60 हजार (3 हजार), कमी पाऊस 15 जून ते 14 जुलै, पावसाचा खंड व जास्त तापमान 15 जुलै ते 15 ऑगस्ट.



या योजनेमध्ये पिक निहाय अधिसूचित महसूल मंडळाची संख्या पुढील प्रमाणे आहे. द्राक्ष-(क) पिकासाठी -33, डाळींब -30, लिंबू -2, पेरु -6 व चिकू पिकासाठी-1. या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असल्याने अधिसूचित क्षेत्रातील सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँक खाते असणाऱ्या जवळच्या प्राधिकृत बँका, प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, संबधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधीशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहीत प्रपत्रात योग्य त्या विमा हप्त्यासह, 7/12 खाते उतारा, आधार कार्ड, बँक खात्याचे तपशिल, घोषणापत्र, बागेबाबत छायाचित्र अक्षांश-रेखांश पत्र इत्यादी कागदपत्रासह विहीत वेळेत जमा करावे. बिगर कर्जदार फळपिक उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेतील गर्दी टाळण्यासाठी प्राधिकृत आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करुन सहभाग नोंदवावा. या योजनेंतर्गत विहीत मुदतीत नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी व दायित्व विमा कंपन्याची असून नुकसान भरपाई देण्याची कोणतेही दायित्व शासनावर नाही. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. मास्तोळी यांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies