“मर्दासारखे लढत राहायचे की गुडघे टेकून शरण जायचे, याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकाने करायलाच हवा”

 
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘विनाकारण त्रास दिला जात आहे, पुन्हा युती करा’ अशी विनवणी केली. यावर आजच्या सामना अग्रलेखातून  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर सविस्तर भाष्य करत शिवरायांच्या स्वराज्याची आठवण करुन दिली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सरकार आहे व तीनही पक्षांना हे विनाकारण त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकाने करायलाच हवा, असा विचार करायला लावणारा सल्ला राऊत यांनी दिला आहे.

 “बरे-वाईट दिवस येतच असतात. वाईट दिवसही निघून जातात. सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते. अर्जुनासारखे लढायचे, शिवाजी महाराजांसारखे शत्रूवर चाल करून जायचे की शत्रूशी ‘तह’ करून मांडलिकी पद्धतीने गुजराण करायची?”

“मोगलांपुढे शिवरायांनी जुळवून घेतले असते तर दऱ्याखोऱ्यांत भटकून लढाया करण्याचे जीवन त्यांच्या नशिबी आले नसते. मोगल बादशहाने त्यांना एखादी मनसबदारी बहाल केली असती व इतर राजांप्रमाणे शिवरायांना त्यावर पिढ्यानं पिढ्या गुजराण करता आली असती; पण शिवरायांनी तसे केले असते तर इतिहासपुरुष, महान योद्धा, स्वाभिमान, अभिमानाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून आपण आज जसे त्यांच्यापुढे नतमस्तक होतो तसे झालो नसतो…”

शिवसेना निखारा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जतन करून ठेवली

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाहीतर परिणामांस सामोरे जा, अशा दाबदबावाला बळी न जाता शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमानाने शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले. म्हणून आजची शिवसेना तेजाने तळपताना दिसत आहे. ही शिवसेना निखारा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जतन करून ठेवली. म्हणून आजही सामान्यातल्या सामान्य तरुणांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदे भोगता आली. कोणत्याही त्रासाची, छळाची, न्याय-अन्यायाची पर्वा न करता लढत राहाणारा शिवसैनिक हेच शिवसेनेचे ‘बळ’ आहे, असंही राऊत अग्रलेखात म्हणाले आहेत.

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured