Type Here to Get Search Results !

“पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे” : प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र





मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 जून रोजी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं ते आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असं सरनाईक म्हणाले आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे निदान प्रताप सरनाईक. अनिल परब आणि रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असंही ते म्हणाले आहेत.

एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेवून फक्त आपल्या मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी इतर पक्षाचे नेते, कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्रं आहे. शिवाय महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून केंद्राशी नकळत छुपी हातमिळवणी करताना दिसत आहे, असा दावा त्यांनी या पत्रात केला आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies