नागपूर : कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन एका व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरच्या पाचपावली परिसरात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आलोक माथुरकर (वय-४८) असं आरोपीचं नाव असून याने त्याची पत्नी विजया, मुलगी परी आणि मुलगा साहिल यांची त्याच्या स्वतःच्या घरात, तर शंभर फुटावर रोडच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या घरात सासु लक्ष्मी देविदास बोबडे आणि मेहुणी अमिषा यांची निर्घुण हत्या केली. आरोपीने सासू आणि मेहुणीला गळा चिरून ठार मारले तर पत्नी मुलगी आणि मुलाची डोक्यावर हातोड्याने फटके मारून हत्त्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास लावून घेतला.
आलोक हा टेलरिंगचे काम करीत होता. गोळीबार चौकात तो भाड्याच्या खोलीत रहात होता. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आलोकचे मेहुणीसोबत प्रेम संबंध होते. त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होत होते. यावरून पती- पत्नीमध्ये वाद होत होते. या भांडणाचा राग मनात धरून आलोकने हे कृत्य केले आहे. ही घटना पहाटेच्यावेळी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिसांचा स्टाफ घटनास्थळी पोहोचला.