सांगली : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली (सिव्हील हॉस्पीटल सांगली) येथे सिटी स्कॅन यंत्रणा, एमआरआय यंत्रणा यासारख्या अत्याधुनिक वैद्यकिय सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना आपण विनंती करणार असल्याचे सांगून कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांना जनतेने संयमाने सहकार्य केले याबद्दल सांगली जिल्हावासियांचे अभिनंदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर रूग्ण उपचारांसाठी शहरांमध्ये येत असतात. शासकीय रूग्णालयांमध्ये त्यांना अत्याधुनिक सर्व उपचार सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत असे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, सांगली शहरामध्ये उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रूग्णांना सिव्हील हॉस्पीटलमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय सारखी यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांची माहिती देत असाताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात 25 दिवसांचा कडक लॉकडाऊन राबविल्याने संक्रमणाची साखळी तोडणे शक्य झाल्याचे सांगून जिल्ह्यात जवळपास ७ ते ८ हजारांच्या आसपास कोरोना स्वॅब टेस्टींग होत आहे. जिल्ह्याचा पॉझीटीव्हीटी रेट सध्या 12 टक्क्यापर्यंत आला आहे असे सांगितले.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या अनुषंगाने कोणती खबरदारी घेतली जात आहे याची विचारणा करून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आवश्यक सर्व उपचार सामग्री व औषधे यांची तजवीज विहित मुदतीत करण्याबाबत निर्देशित केले.
यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार शिवसेना पक्षाच्या वतीने 14 व्हेंटीलेटर्स प्रशासनाकडे प्रदान करण्यात आले. यातील 2 व्हेंटीलेटर उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ, उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर 3, ग्रामीण रूग्णालय तासगाव 2, ग्रामीण रूग्णालय विटा 3, सांगली जिल्हा रूग्णालय 2 व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज 2 याप्रमाणे वाटप करण्यात आले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस