Type Here to Get Search Results !

आदर्श पोलीस प्रतिमा निर्माण करण्यात सांगली पोलीस दल यशस्वी-पालकमंत्री जयंत पाटील



सांगली :  जिल्ह्यात कामाच्या माध्यमातून पोलीस दलाने विशेष प्रगती केली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात आदर्श पोलीसाची प्रतिमा निर्माण करण्यात सांगली पोलीस दल यशस्वी झाले आहे. अनेक गुन्हे लवकर उघडकीला आणले आहेत. त्याच बरोबर चोरीचा छडा लावून मिळालेला मुद्देमाल संबधितांना तातडीने परत केला आहे. पोलीस दलाच्या या कामामुळे सांगली पोलीस दल अभिनंदनास पात्र आहे. असे गौरवउद्गार जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी काढले. 


चिंचणी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन



पोलीस अधिक्षक कार्यालयात आय एस ओ (ISO) स्मार्ट पोलीस स्टेशन प्रमाणपत्र प्रदान, ई-पेट्रोलिंग ॲप,ई-लायब्ररी ॲप चे उद्घाटन व चोरीचा मुद्देमाल परत करणे या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, जिल्हा नियोजन समितीचे संजय बजाज, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 





या वेळी  पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सध्या चालू असलेले पेट्रोलिंग आता ई-पेट्रोलिंग द्वारे होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांना वचक बसणार आहे व गुन्हेगारीचे प्रमाणही मर्यादित येईल, असा विश्वास वाटतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तसेच कायम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचे लोकेशन ॲपच्या माध्यमातून ट्रॅक करता येईल. सांगली पोलीस दलाने अशाच प्रकारच्या नवनवीन आधुनिक सुधारणा आपल्या दलात केल्या आहेत, याचा विशेष आनंद वाटतो. जिल्ह्यातील पोलीस स्थानके सुधारण्यासाठी पोलीस प्रमुखांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानेही त्यांना तितकीच चांगल्या प्रकारे साथ दिली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीसस्टेशनची डागडुजी, रंगरंगोटी चांगल्या पध्दतीची करण्यात आली आहे. त्याच बरोबर अनेक सुविधाही पोलीस स्टेशन्सना उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस स्टेशन आता आदर्श पोलीस स्टेशन्स झाली आहेत. 





पोलीस दलाला आधुनिक सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिल्यास पोलीस दल अधिक आक्रमकतेने काम करेल, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, गेल्या दिड वर्षातील कोविड काळात पोलीस दलाने तासंतास रस्त्यावर उतरुन अत्यंत उत्तमप्रकारे काम केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोलीस दलाने अधिक कठोरतेने कारवाई केल्याचा परिणाम चांगला दिसून आला. बंदीच्या काळात नागरिक बाहेर पडण्यास धजत नव्हते त्यामुळे कोरोनाची पहिली लाट आटोक्यात आणण्यास मदत झाली. 





यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, एखाद्या गुन्ह्या संदर्भात किंवा एखाद्यी घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला आलेल्या कॉल नंतर तातडीने कमीतकमी वेळात त्या ठिकाणी पोलीस दल पोहचणे हे महत्वाचे आहे. त्याबरोबर गुन्ह्याचा तपास कमीतकमी वेळेत लागण्यासाठी तपासची यंत्रणा गतीमान झाली पाहिजे तरच गुन्हेगार हाती लागतील. गुन्ह्याच्या ठिकाणावरुन कॉल आल्यानंतर त्या ठिकाणचे लोकेशन कॉल सुरु असतानाच स्ट्रेस झाली पाहिजे अशी यंत्रणा पुढील काळात आली पाहिजे. असे सांगून ते पुढे म्हणाले, सांगली पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 25 नवीन चार चाकी व 50 दोन चाकी गाड्या देण्यात आल्या आहेत. सांगली पोलीस दलानेही चांगल्या पध्दतीने काम करुन एक आदर्श निर्माण केला आहे. 





यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक मनोज लोहिया म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्रात सांगली पोलीस दलाने आधुनिक पध्दतीने काम करुन एक चांगला आदर्श घालून दिला आहे. यासाठी मी पोलीस अधिक्षकांसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. पोलीस दलामध्ये काम करत असताना पोलीसांना स्वत:ची प्रतिमा चांगल्या पध्दतीने राखावी लागते. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करुन त्याचा योग्य पध्दतीने वापर करणे आणि त्याचबरोबर समाजाला एक चांगली सेवा उपलब्ध करुन देणे हा एकमेव मार्ग पोलीस दलाची प्रतिमा सुधारु शकतो. सांगली पोलीस दलाने कोरोना काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच स्वच्छता राखण्याचे विशेष काम केले आहे. त्यामध्ये मुदतबाह्य झालेली कागदपत्रांचे वर्गीकरण अत्यंत कमी वेळत करुन अनावश्यक  सात टन रद्दी काढली. ते काम खरोखर कौतुकास पात्र आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहिल्या नाहीत. त्यासाठी लागणारा क्लिन प्लॅटफॉर्म पोलीस दलाने ठेवला आहे. त्याच बरोबर कार्यालयातही निटनेटकेपणा ठेवला आहे. त्यामुळे आयएसओ मानंकन प्राप्त झाले आहे. 





यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली पोलीस दलाने सुरु केलेले विविध उपक्रमासाठी त्यांचे अभिनंदन करून पोलीस दलाने स्मार्ट पध्दतीने काम करुन पोलीस स्टेशनचे रुपच पालटवले असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, आधुनिक पध्दतीने काम करुन पोलीस दलाचे जे सक्षमीकरण झाले आहे आणि त्यांच्या कामात जी गती आली आहे त्याचाच आदर्श जिल्ह्यातील इतर सर्व विभागांनी घेवून आपल्या विभागाचे आधुनिकीकरण करण्यावर भर द्यावा. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही वाढेल व जनतेला चांगल्या सुविधा दिल्या जातील. सांगली पोलीस दलाने आधुनिकतेने सुरु केलेल्या कामामुळे पुढील काळात सांगली पोलीस दल स्मार्ट पोलीस दल म्हणून ओळखले जाईल असेही ते म्हणाले. 



यावेळी पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम म्हणाले, जिल्ह्यामध्ये तीन हजार कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासासाठी लागणारे सुमारे 800 पुस्तके पोलीस दलाने विकसीत केलेल्या ॲपवर मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. हीच पुस्तके पुढे पाच हजारांपर्यंत वाढविण्याचा मानस असल्याचे सांगून यावेळी त्यांनी सांगली पोलीस दलाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी दिली.   





प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते गुन्हेगारांकडून हस्तगत करण्यात आलेला किंमती मुद्देमाल संबधित मालकांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी विशेष कामगिरी केलेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमातील उपस्थितींचे आभार अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले यांनी मानले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies