बालरूग्णासाठी मिरजेत "एवढ्या" आयसीयु बेडचे कोरोना सेंटर I संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी सुरु

 


माणदेश एक्सप्रेस न्युज I सांगली : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असल्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित झाली तर त्यांच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथील बालरूग्ण विभागात  50 आयसीयु बेडचे लहान मुलांसाठी कोरोना सेंटर सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी आत्तापर्यंत अंदाजित 2 कोटी रूपये इतका खर्च झाला आहे. तसेच नविन 21 के.एल. क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची उभारणीही पूर्णत्वाकडे आली आहे. त्यासाठीही 60 लाख रूपये इतका खर्च झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय  मिरज येथे भेट देवून विविध विभागांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. रूपेश शिंदे, बालरोगतज्ज्ञ डॉ. शिशीर मिरगुंडे, इलेक्ट्रिशन विभागाचे शितल शहा आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येवू नये यासाठी प्रयत्नशील आहोतच पण जर आली तरी त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासन काम करीत आहे. या अंतर्गतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे 21 के.एल. क्षमतेचा ऑक्सिजन टॅंक कार्यान्वित होणार आहे.  हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे तीन ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित आहेत. यामध्ये प्रत्येकी 125 जम्बो सिलेंडर प्रतिदिन भरणारे दोन प्लांट आहेत. तर उर्वरित प्लांट मधून साधारणतः 250 जम्बो सिलेंडर्स प्रतिदिन भरण्यात येणार आहेत. असे एकूण 500 जम्बो सिलेंडर्स प्रतिदिन ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसविल्या आहेत. हे प्लांट हवेतून ऑक्सिजन जनरेट करणारे आहेत.  यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आवश्यक असणाऱ्या सर्व वॉर्डना योग्य दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा करणे सोयीस्कर होणार आहे.

सद्यस्थितीत कोरोना बाधितांवर रूग्णालयांमध्ये उपचार होत आहेत. तथापि, कोरोनानंतर उद्भवणाऱ्या पोस्ट कोविड रूग्णांचेही दिवसेंदिवस प्रमाण वाढत असून त्यांच्यावरही उपचार होणे आता गरजेचे झाले आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात पोस्ट कोविड उपचार सेंटर सुरू करण्याबाबत कार्यवाही व्हावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना काळात रूग्णालयाचे अद्ययावतीकरण झाले असून विविध प्रकारच्या मशिनरी येथे कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी लागणारा वीज पुरवठा मात्र पुर्विचाच असल्याने सद्यस्थितीतील वीज पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नविन ट्रान्सफॉर्मर रूग्णालयात बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. यासाठी लागणारा आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून रूग्णालयासाठी एक ऑक्सिजन प्लाँट मंजूर झाला असून तो उभारण्यासाठी जागेची निश्चिती करावी. रूग्णालयास लागणारी आवश्यक साधनसामग्री तसेच उपकरणे यासाठी लागणारा निधी याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत. यासाठी लागणारा निधी प्राथम्यक्रम ठरवून उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर रूग्णालयात बसविण्यात येणाऱ्या उपकरणांचे, मशिनरीचे तसेच विविध प्लाँटचे संबंधित विभागांकडून ऑडिट करून घेवून त्याचे प्रमाणिकरण करण्यात यावे, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured