Type Here to Get Search Results !

“या” संस्थांचे कार्य कौतुकास्पद I सभापती पुष्पाताई सरगर I घरनिकीत "विमुक्त दिन" साजरा



माणदेश एक्सप्रेस न्युज I आटपाडी I इकोनेट व अग्रणी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आटपाडी पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई सरगर यांनी केले. घरनिकी (ता.आटपाडी) येथे आयोजित ३१ ऑगस्ट "विमुक्त दिवस" कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होत्या. 



३१ ऑगस्ट विमुक्त दिनानिमित्त "पंचायतराज" विषयावर चर्चासत्र व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम इकोनेटच्या युवा सारथी गटाकडून आयोजित करण्यात आला होता. राजमाता अहिल्याबाई होळकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक, संविधाननिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी "आपले भविष्य भारतीय संविधान" हे पुस्तक देऊन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 



भारतीय संविधानाच्या माध्यमातून भटक्या-विमुक्तांना स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत तालुक्याचे नेते जयवंत सरगर यांनी मांडले. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी इंग्रजांनी केलेल्या १८७१ सालच्या "गुन्हेगार जमाती कायद्यानुसार भटक्या जमातींना पारतंत्र्यातच जगावे लागत होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल पाच वर्षांनी भटक्या जमातींना गुन्हेगार ठरवणारा १८७१ चा "सेटलमेंट कायदा" ३१ ऑगस्ट १९५२ रोजी रद्द केला आणि गुन्हेगार जमातींना या दिवशी "विमुक्त जाती" म्हणुन ओळख देण्यात आली. गावगाड्यातून बाहेर असलेला भटकंती करणारा हा समुदाय मुख्य प्रवाहात येऊन जगू लागला. मात्र आजही ह्या जमाती विकासापासून वंचित आहेत. या समुदायाचे अनेक प्रश्न आहेत. विमुक्तांच्या शाश्वत विकासासाठी एकदिलाने व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करुया असे मनोगत सरपंच प्रा.अमोल खरात यांनी व्यक्त केले. पोलीस पाटील पुष्पाताई बोबडे यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना संघर्ष करावा लागतो असे मत मांडले. ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व करताना आलेले चांगले-वाईट अनुभव उपस्थित महिला सदस्यांनी कथन केले.



बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ व एम.एम.ग्रुपचे अध्यक्ष अक्षय माने यांनी विमुक्तांच्या विकासासाठी समुदायाचे संघटन इकोनेट व अग्रणी संस्थेच्या माध्यमातून व्हावे. पुढील काळात संस्था व संघटनांनी एकत्रित येऊन विमुक्त समुदायाचे संघटन करण्यासाठीं काम करूया असे मत व्यक्त केले. इकोनेट व अग्रणी संस्थेकडून कोरोना संकटकाळात अन्नधान्याचे किट व कोरोना प्राथमिक तपासणी किटचे वाटप केल्याबद्दल सरपंच सौ.संगीता मासाळ संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमास सरपंच विक्रम दाईंगडे, मनोहर नामदेव पडळकर, उपसरपंच विनोद खरात, सौ.सावित्री पडळकर यांच्यासह घरनिकी, वलवण, जांभुळणी, घरनिकी, पिंपरी, मानेवाडी, चिंचाळे, घाणंद गावातील २२ विद्यमान ग्रा.पं.महिला सदस्या प्रमुख उपस्थित होत्या. 



डॉ.बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संस्थेकडून विमुक्त दिनानिमित्त उपस्थितांना मास्क, सॅनिटायझर, टूथपेस्ट, सॅनिटरी पॅड, साबण इ. वस्तूंचे वाटप केले. याप्रसंगी अग्रणी संस्थेचे संचालक शिवाजी खैरमोडे यांच्यासह अमोल मेटकरी, महेश पोतदार, शरद कारंडे, अमोल पडळकर, अंकुश मूढे, शरद कोळेकर उपस्थित होते. कार्यक्रमात कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. सूत्रसंचालन मनोज कांबळे, प्रास्ताविक प्राजक्ता ढोले, आभार रमेश मलमे यांनी मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies