शहरातील जंगली महाराज रोडवरील एका मुलींच्या शाळेत शिरुन एका नराधमाने ११ वर्षांच्या मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी डेक्कन जिमखाना परिसरात राहणार्या एका ४० वर्षांच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा येथील शाळेत शिरुन एकतर्फी प्रेमातून दहावीतील मुलीवर खूनी हल्ला करण्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, शाळेत सीसीटीव्ही आहेत. त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत. शाळेत कार्यरत असलेल्या कोणा पुरुषाचे हे काम नाही, याची तपासणी आम्ही केली आहे. हा आरोपी बाहेरचा असल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षांची मुलगी जंगली महाराज रोडवरील शाळेत शिकायला आहे. बुधवारी सकाळी ती शाळेत गेली होती. यावेळी एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करुन तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बाहेर कुणाला काही सांगितलेस तर बघ, अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.