Type Here to Get Search Results !

गुढीपाडवाच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री करणार मेट्रोचे उद्घाटन!

  



मुंबई ; मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरता सुरु होणार आहे. सात वर्षांपूर्वी जुन २०१४ ला मेट्रोचा पहिला मार्ग घाटकोपर ते वर्सोवा हा प्रवासी वाहतुकीकरता सुरु झाला. त्यानंतर मुंबईत एकुण पाच मेट्रो मार्गांच्या कामाला टप्प्याटप्प्याने सुरुवात  झाली. यापैकी दोन मेट्रो मार्गावरील काही भागात प्रवासी वाहतुक अखेर सुरु होणार आहे. ‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो २ अ’  च्या सुमारे २० किलोमीटर मार्गावर येत्या शनिवारपासून मेट्रो आता प्रवाशांना घेऊन धावणार आहे.



येणाऱ्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ या दोन्ही मार्गांचे भुमिपुजन हे ऑक्टोबर २०१५ मध्ये झाले होते. २०१६ मध्ये या दोन्ही मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती . २०२१ पर्यंत हे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतु करोना आणि टाळेबंदी यामुळे या मेट्रो मार्गाच्या कामावर परिणाम झाला होता . शेवटी अनेक अडथळे पार करून  काही महिन्यांपूर्वी या मेट्रो मार्गावर प्रत्यक्ष मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात झाली आणि शेवटी  येत्या शनिवारी या दोन्ही मार्गावरील काही टप्पे हे प्रवासी वाहतुकीकरता सुरु होत आहे.



मेट्रो २ अ हा मार्ग डीएन नगर ते दहिसर पश्चिम असा एकुण १८.५ किलोमीटर लांबीचा, प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील लिंक रोडला समांतर जात असून या मार्गावर एकुण १७ मेट्रो स्थानके आहेत. तर मेट्रो ७ हा अंधेरी ते दहिसर पूर्व असा पश्चिम द्रुतगती मार्गावरुन जाणारा १६.६ किलोमीटरचा मार्ग असून यावर एकुण १३ मेट्रो स्थानके आहेत. हे दोन्ही मार्ग दहिसर भागात एकमेकांना जोडले गेले आहेत हे विशेष. या दोन्ही मार्गांवरील दहिसरच्या दिशेकडचा काही भाग हा प्रवासी वाहतुकीकरता खुला होणार आहे.



शनिवारपासून या दोन्ही मेट्रो मार्गावरील एकुण २० किलोमीटर मार्गावरुन मेट्रो प्रवाशांना घेऊन धावणार आहे. तर हे वर्ष संपायच्या आत हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे हे दोन्ही मेट्रोचे मार्ग पुर्णपणे वाहतुकीकरता सुरु झालेले असतील. या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे पश्चिम उपनगरातील लाखो लोकांना प्रवासी वाहतुकीचा एक नवा आणि लवकर  असा पर्याय उपलब्ध होणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांवर कमीत कमी १० रुपये असा तिकीटाचा दर निश्चित करण्यात आला आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies