नवी दिल्ली: श्रीलंका सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाशी लढत आहे. या देशाला वीज वाचवण्यासाठी आपले पथदिवे बंद करावे लागतात.मिळालेल्या माहितीनुसार, एका मंत्र्याने आज सांगितले की, दशकातील सर्वात वाईट आर्थिक संकटामुळे त्यांना पथदीवे बंद करण्याची वेळ आली आहे. लोडशेडिंगचा देशाच्या मुख्य शेअर बाजारावर परिणाम झाला असून व्यापाराला फटका बसला आहे. तसेच, देशात डिझेल संपल्याचेही समोर आले आहे. देशात आज डिझेल संपल्याने वाहनांच्या रांगा लागल्या असल्याची माहिती उघडकीस येत आहे.
उर्जा मंत्री पवित्रा वान्नियाराची यांनी सांगितले की, “आम्ही अधिकार्यांना आधीच वीज वाचवण्यासाठी देशभरातील पथदिवे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेजारच्या भारतातून ५०० दशलक्ष डॉलर क्रेडिट लाइन अंतर्गत डिझेल शिपमेंट शनिवारी येण्याची अपेक्षा आहे, परंतु परिस्थिती लवकरच सुधारण्याची शक्यता नाही,” असे त्यांनी पत्रकारांशी सांगितले आहे.
श्रीलंकेत परिस्थिती दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे. हा देश दिवसातील १३ तासांपर्यंत वीज कपातीशी लढत आहे, कारण सरकार परकीय चलनाच्या कमतरतेमुळे इंधन आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही. कोलंबो स्टॉक एक्स्चेंजने ब्रोकर्सच्या विनंतीवरून या आठवड्यातील उरलेली वीज कपात केल्यामुळे दैनंदिन व्यवहार नेहमीच्या साडेचार तासांवरून दोन तासांपर्यंत कमी केले, असे बाजाराने एका निवेदनात म्हटले आहे. पण गुरुवारी शेअर बाजार उघडल्यानंतर शेअर्स घसरले आणि CSE ने ३० मिनिटांसाठी ट्रेडिंग थांबवले.