बीड : पिंपरवाडा ता.धारुर येथे आज दुपारी तरुणाचा घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घराला लागलेल्या आगीत बहीण व लहान मुलांना वाचवण्याचे प्रयत्न करत असताना हि दुर्घटना घडली आहे.
घटनास्थळ व मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरवाडा येथून अर्धा किमी अंतरावर उत्तरेस श्रीहरी कारभारी तिडके व रामकिसन कारभारी तिडके यांचे शेतात पत्र्याचे शेड व गोठा आहे. दुपारी गोठ्यास अचानक आग लागली. गोठ्यातील बहीण व लहान मुलांना बाहेर काढून आग विझवण्यासाठी श्रीहरी तिडके यांचा मुलगा रवी तिडके (वय २१) हा जवळील टाकीतील पाणी घेऊन आग विझवत असताना अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात टाकीचा पत्रा मानेला लागल्यामुळे गंभीर जखमी होऊन रवी श्रीहरी तिडके याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात अकस्मात झालेल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच, धारूर व केजच्या अग्निशमन बंब पाचारण करून आग नियंत्रणात आणली परंतु तोपर्यंत पत्राच्या शेडचे घर पुर्ण जळून खाक झाले होते.