Type Here to Get Search Results !

ग्रामीणमध्ये वीज गूल; अमरावती जिल्ह्याला दोन ते चार तासांच्या अघोषित भारनियमनाचा दणका



अमरावती : राज्यातील विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच्या तुलनेत पुरवठा मात्र कमी झाला आहे. यामुळे जिल्ह्यालाही अघोषित भारनियमनाचा फटका बसला आहे. दोन ते चार तासांचे भारनियमन दररोज होत असल्याने त्रास वाढत आहे.


महावितरणकडून इमर्जन्सी लोडशेडिंग करण्यासाठी दरदिवशी वेळेवर वेळापत्रक जाहीर करण्यात येते. त्यानुसार कंपनीला भारनियमनाचा निर्णय घ्यावा लागत आहे. यातूनच वेगवेगळ्या ठिकाणी भारनियमनाचा फटका बसला आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात भारनियमनामुळे नागरिकांना फटका बसत आहे. हे संकट टाळण्यासाठी महावितरण सीजीपीएलकडून वीज खरेदी करेल, अशी माहिती पुढे येऊ लागली आहे.


संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. उष्मांक वाढत आहे. एप्रिल महिन्यातच मे हीटची स्थिती निर्माण झाली आहे. ४२ अंशापर्यंत शहराचे तापमान पोहोचले आहे. अशा परिस्थितीत घरात राहिले, तर पंखा लावायलाही वीज नाही. बाहेर निघाले तर उन्हाचे चटके. अशा परिस्थितीत राहायचे कसे, असा प्रश्न प्रत्येकापुढे निर्माण झाला आहे. महावितरणने विजेची खरेदी केली, तर ही अडचण दूर होण्यास मोलाची मदत मिळणार आहे.

ग्रामीण भागात मोठी समस्या

गावखेड्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग होत आहे. रात्री-अपरात्री कधीही वीज गूल होते. त्यामुळे रात्रीच्या उकाड्यापासून ग्रामीण भागातील नागरिक चांगलेच हैराण बनले आहेत.सध्या इमर्जन्सी लोडशेडिंग केले जात आहे. वेळेवर मिळणाऱ्या सूचनेनुसार हे भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे निश्चित असे तास सांगता येत नाहीत. उपलब्ध वीज पाहता, लोडशेडिंगची वेळ ठरविली जाते. 


शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचे भारनियमन करण्यात येत आहे. यामुळे गावखेड्यांतील नागरिक चांगलेच वैतागले आहेत.शहरी भागात भरदिवसाही पथदिवे सुरू असतात. अशावेळी त्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. हीच वीज ग्रामीण भागासाठी पाठवावी.ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही भारनियमन होत आहे. यावर मात करण्यासाठी इन्व्हर्टर खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. इलेक्ट्रीकल साहित्याच्या दुकानातून छोट्या इन्व्हर्टरसह मोठे इन्व्हर्टरसुद्धा खरेदी केले जात आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies