दोन वर्षांनंतर पुन्हा उतरले निसर्गाचे ‘सफाई कामगार’ पक्षीप्रेमींकडून निरीक्षण

 


गडचिरोली : पर्यावरण व अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून ओळख असलेल्या गिधाडांचे अस्तित्व राज्याच्या काही भागातच शिल्लक आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील वर्षीच्या दिवाळीत गिधाडांचे दर्शन लोकांना झाले होते. त्यानंतर गिधाड कुठे गेले, याबाबत पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता होती. त्यातच १६ एप्रिल रोजी कुनघाडा रै. वनपरिक्षेत्रातील जोगना उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४० कुथेगाव जंगल परिसरात ताडाच्या झाडावर १० ते १५ च्या संख्येने गिधाडे आढळून आली. यामुळे वनविभागासह पक्षीप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


गिधाड हा निसर्गातील महत्त्वपूर्ण सजीव घटक आहे. अन्नसाखळीतील त्याचे स्थान अढळ आहे. गिधाड हा कधी शिकार करीत नाही. मृत जनावरांच्या मांसावर तो आपला उदरनिर्वाह चालवतो. गडचिरोली जिल्ह्यात साधारणता तीन दशकांपूर्वी गिधाडाचे अस्तित्व गावागावांत दिसून येत होते. मात्र, झपाट्याने गिधाडांची संख्या कमी झाली. २०१०मध्ये नवेगाव रै. नियत क्षेत्रातील सराड, बोडी परिसरात विषबाधा झाल्याने जवळपास ४३ गिधाडे बेशुद्ध पडलेली आढळली होती. यात काही मृत झाली, तर काही उपचारानंतर बरी झाले. त्यामुळे गिधाड संरक्षणार्थ कुनघाडा रै. वनपरिक्षेत्राने दखल घेऊन येथे गिधाड संरक्षण केंद्र स्थापन करून नवेगाव, दर्शनी, मालेर माल, मारकबोडी, आदी ठिकाणी गिधाड उपाहारगृहाची निर्मिती केली व त्यांच्यावर देखभाल ठेवण्यासाठी गिधाड मित्रांची निवड करून गावागावांत जनजागृती केली.

 

दिवसेंदिवस निर्माण होत असलेला अन्नाचा तुटवडा, निवासयोग्य झाडांचा अभाव, प्रतिकूल परिस्थिती, आदी कारणांमुळे गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरण रोगमुक्त करून मानवी स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी गिधाड संरक्षण काळाची गरज आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured