कोरोना संकटाचा मुकाबला करताना लोकांचे जीव वाचायला हवेत या हेतूने पोलिसांनी रात्रदिवस रस्त्यांवर खडा पहारा दिला. त्यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. निर्बंध झाल्यानंतर दोन वर्षांत साजरे न झालेल्या सण-उत्सवाला, जयंती-मिरवणुकीवेळी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागली.
दैनंदिन काम करतानाच पोलिसांनी सव्वादोन वर्षांत बहुतेकवेळा ना सुटी, ना रजा घेता केवळ ड्युटी करून त्यांची पॉवर दाखवून दिली. अनेकांना त्या काळात सुटी, रजा मिळत नाही. देशा मागील सव्वादोन वर्षांत कोरोना संकटाचा मुकाबला करत असतानाच जिल्ह्यात लागू केलेल्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी, संचारबंदीत बंदोबस्ताची भूमिका, गर्दी होणार नाही आणि गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची पुरेपूर दक्षता पोलिस बांधवांनी घेतली. अतिवृष्टी, महापूर, कोरोनासह इतर संकटात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पोलिसांनी कुटुंबाची व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावले, त्यांच्या कार्याला सलाम.
कोरोनासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व राज्यपालांचे दौरे, आरक्षणाच्या मुद्द्यांवरून होणारी आंदोलने, विविध मुद्द्यांवर निघालेले मोर्चे, उपोषणावेळीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटी सांभाळली. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. वर्षातून चारवेळा मोठ्या वाऱ्या असतात. त्यावेळीही पोलिस बंदोबस्त देतात. भीमा-कोरेगावलाही दरवर्षी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागते. शिवजयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव (दसरा)अशावेळीही मोठा बंदोबस्त लागतो. एसटी महामंडळाचे आंदोलन आणि आता भोंग्यांवरून वातावरण पेटले असून त्यासाठीही पोलिसांनी बंदोबस्ताची ड्युटी चोख बजावली.
रिक्त पदांमुळे पोलिसांवरील वाढला ताण
कोरोना काळात अनेक पोलिसांनी जीव गमावला आहे. अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तसेच अपघात किंवा आजारपणामुळे काहींचा मृत्यू झाला.त्यामुळे राज्याच्या पोलिस दलात सध्या १८ हजारांहून अधिक पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत. अतिशय कमी मनुष्यबळात पोलिसाना अतिरिक्त काम करावे लागत आहे. वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचे प्रमाण, कामाचे बदलते स्वरूप व वाढलेला ताण लक्षात घेऊन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पोलिसांची भरती होईल, अशी शक्यता आहे. सद्यस्थिती पाहता आगामी काळात भरती करावीच लागणार आहे.