पूर्व मोसमी पावसाची सांगलीत जोरदार हजेरी

 


सांगली : या वर्षी हंगामात आगमनलाच सलग वीस तासांहून अधिक काळ मान्सून पूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली असून दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जत तालुक्यातील पूर्व भागात ओढय़ांना पूर आले आहेत. वळसंग पाच्छापूर मार्गावरील पूल पाण्यात गेल्याने पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात सरासरी ५२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस डफळापूर येथे १२६.३ मिलीमीटर नोंदला.


उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर दमदार पावसाची आस होती, मात्र गुरुवारी दुपारपासून जत, कवठेमहांकाळ आणि सायंकाळ पासून सांगली, मिरजेसह तासगाव तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. शुक्रवारी दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी केव्हाही पाऊस होईल अशी स्थिती कायम राहिली आहे. जिल्ह्यातील ताकारी, कोकरुड व कासेगाव या तीन मंडळाच्या कक्षेतील गावात पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र तरीही १३ ते १५ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. अन्य मंडलात पावसाने आगमनालाच दमदार हजेरी लावली. ही तीन मंडळे वगळता अन्य सर्वच ठिकाणी ५० मिलीमीटर पेक्षा जादा पाऊस झाला आहे.


जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ५२.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जत तालुक्यात ९३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ७१.४, जत ९३.४, खानापूर-विटा ३८, वाळवा-इस्लामपूर ३३.५, तासगाव ५५.6, शिराळा २१.०४, आटपाडी २४.८, कवठेमहांकाळ ८६.९, पलूस ४6.७, कडेगाव १७.८. दरम्यान, हा पाऊस मान्सून पूर्व असून नियमित मान्सूनचा पाऊस ५ ते १० जूनदरम्यान सुरू होईल. तोपर्यंत शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला जिल्हा क्रषी अधीक्षक मनोजकुमार वेताळ यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured