नागपूर : रेल्वे व एसबीआयमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून युवकांना तब्बल दीड कोटीने गंडा घालणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिस आर्थिक विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. यात तिघांना अटक केली. सुरुवातीला बारा युवकांची तक्रार असताना पोलिसांच्या आवाहनानंतर आणखी पाच तरुणांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्यामध्ये अमरावतीसह नागपूररातील पाच युवकांचा समावेश आहे.
त्यामध्ये जानेवारी महिन्यात केळवद पोलिस स्टेशनमध्ये शिल्पा, कोवे त्याच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कोवे याने पंचशील चौकात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या सुसाईड नोट आणि व्हॉट्सॲप संदेशावरुन घटनेचा टोळीचा खुलासा झाला. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हेशाखेचे प्रभारी उपअधीक्षक आर.डी. निकम यांच्याकडे सोपविला. पोलिसांनी शिल्पाला अटक केली. तिची दहा दिवस पोलिस कोठडी घेतली. याशिवाय तिच्या बंगल्याची झडती घेतली. तेव्हा शिल्पा व तिच्या साथीदारांनी ज्याची फसवणूक केली, त्यांनी समोर येण्याचे आवाहन केले. पाच युवकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार पोलिस त्यांची साक्ष नोंदवित आहे अशी माहिती आहे.
तक्रारी असलेल्या ठिकाणीच तपास
ग्रामीण भागातील ९ युवकांना तर शहरातील ३ युवकांना नोकरी देण्याच्या नावावर शिल्पा पालपार्थी हिच्या टोळीने गंडविले. याशिवाय अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागातही तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आता पाच आणखी तक्रारी आल्याने तिच्या विरोधात ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तक्रार आली आहे, तेथील ठाण्यातूनच प्रकरणाचा तपास देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.