आंब्यासाठी अद्याप १५ दिवसांची प्रतीक्षा

 


रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर झाल्याने एप्रिल, मे महिना आंब्याचा हंगाम असतानाही बाजारात किरकोळ प्रमाणात आंबा उपलब्ध आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये केवळ २० ते २२ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी येत आहेत. आंब्याचे प्रमाण कमी असल्याने अजूनही दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. १५ दिवसांनी बाजारात आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वसामान्यांना हापूसचा आस्वाद मे मध्येच घेता येणार आहे.


सध्या बाजारात आंबा किरकोळ प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे. वाशी मार्केटमध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांतून २० ते २२ हजार पेट्या इतकाच आंबा विक्रीला जात आहे. दरवर्षी याचवेळी ८० हजार ते एक लाख पेट्या विक्रीला जातात. मात्र, यावर्षी उत्पादन कमी झाल्याने आंबा कमी आहे. आंब्यासाठी मागणी चांगली आहे, त्यामुळे सध्या तरी वाशी मार्केटमध्ये येणारा आंबा हातोहात संपत आहे.अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, नीचांकी तापमान याचा परिणाम आंबा पिकावर झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. हा आंबा तयार होऊन बाजारात येईपर्यंत एप्रिल संपेल, अशी शक्यता बागायतदारांकडून वर्तविण्यात येत आहे.


दरवर्षी वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक या दिवसात मोठ्या प्रमाणावर असते. आवक वाढली की, दर गडगडतात. यावर्षी एकूणच आंबा कमी असल्याने दर अधिक आहे. ते सर्वसामान्यांसाठी परवडणारे नाहीत. मे महिन्यात आंब्याची आवक वाढल्यानंतर मुंबई मार्केटमधून सुरत, राजकोट, गुजरात, अहमदाबाद, पुणे, कोल्हापूर, सांगली मार्केटमध्ये आंबा विक्रीला पाठविला जाण्याची अपेक्षा आहे. आखाती प्रदेश व अन्य देशांत निर्यात होऊ शकते. मात्र, कोकणातून जाणाऱ्या आंब्याचे प्रमाणच कमी आहे. यावर्षी आंबा कमी असल्याने शेवटपर्यंत दर टिकतील, अशी अपेक्षा बागायतदार व्यक्त करीत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured