नवी दिल्ली : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेला विजयाने सुरुवात केली. साउथॅम्प्टन येथील रोझ बाउल स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 50 धावांनी धुव्वा उडवून भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 198 धावा केल्या, त्यानंतर इंग्लंडचा संघ 19.3 षटकांत 148 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात विजय मिळवताच रोहित शर्मा T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सलग 13 विजय नोंदवणारा पहिला कर्णधार बनला.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने चमकदार कामगिरी केली. हार्दिकने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये योगदान देत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रोवला. हार्दिक टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये अर्धशतक आणि 4 विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला. त्याने 51 धावांचे योगदान दिले आणि 4 बळीही घेतले. हार्दिकने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या.