Type Here to Get Search Results !

खानापूर तालुक्यात जि.प. गटात महिलाराज : जिल्हा परिषदेच्या चार हि गटात महिला आरक्षण तर पंचायत समितीचे चार गण महिलासाठी आरक्षित




मुनीर सुलताने : खानापूर तालुक्यातील जि.प.गट, पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले. यानुसार जि.प. सर्वच्या सर्व ४ गटामध्ये महिलाराज येणार आहे. तर पंचायत समितीच्या आठ गणापैकी ४ गण महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मोठी संधी निर्माण झाली आहे.


जिल्हा परिषद गटामध्ये नव्याने तयार झालेला करंजे गट हा ओबीसी महिलांना राखीव आहे. तर करंजे पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला व बलवडी गणात सर्वसाधारण असे आरक्षण आहे. या गटात आ.अनिल बाबर गट प्रबळ आहे. तर मा.जि.प.सदस्य व कॉंग्रेसचे नेते सुहास शिंदे, राष्ट्रवादीचे सचिन शिंदे व भाजपचे सुहास पाटील यांची ताकद समसमान आहे. याच मतदारसंघात करंजेचे मा.सभापती दादासाहेब पाटील, करंजेचे मा.सरपंच भानुदास सुर्यवंशी, हिवरेचे बबन हसबे, बेनापूरचे राजाभाऊ शिंदे व बलवडीचे तानाजी पाटील हे दखलपात्र नेते आहेत. 


लेंगरे गटात ओबीसीं महिलेसाठी तर लेंगरे पंचायत समिती गण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी व पारे गण ओबीसींसाठी राखीव आहेत. या गटामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांची निर्णायक ताकद आहे. याचबरोबर शिवसेनेचे मा.जि.प.सदस्य फिरोज शेख, प्रकाश बागल हे दखलपात्र नेते या मतदारसंघात आहेत. पारे गावचे सुपुत्र व कॉंग्रेसचे नेते विठ्ठल साळुंखे हे भाळवणी जि.प.गटातून इच्छुक होते. परंतु त्यांचा मतदारसंघ राखीव झाल्याने ते काय भूमिका घेतात यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत.


नागेवाडी जि.प.गट हा सर्वसाधारण महिला व नागेवाडी व गार्डी गण सर्वसाधारण असल्याने येथे हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ आ.अनिल बाबर यांचा घरचा मतदारसंघ आहे. तसेच येथून युवा नेते सुहास बाबर निवडून गेले आहेत. त्यामुळे ते ठरवतील तोच उमेदवार या ठिकाणाहून एकतर्फी निवडून येऊ शकतो. या कॉंग्रेसचे रविंद्र देशमुख, मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते सुशांत देवकर, राजू जानकर, किसन जानकर, ओबीसी नेते संग्राम माने, आ.बाबरांचे एकनिष्ठ मा.सभापती हणमंत तामखडे यांची ताकद मोठी आहे.


भाळवणी जि.प. गट व पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिला तर आळसंद गण ओबीसी महिला असे आरक्षित झाले आहे. या गटात राष्ट्रवादीचे एकमेव विद्यमान पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, नितीन जाधव, शिवसेनेचे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, ढवळेश्वरचे दिलीप किर्दत यांचे गट मजबूत आहे. तर हिम्मत जाधव, गिरीदेव पाटील हे ही दखलपात्र कार्यकर्ते या मतदारसंघात आहेत.


गेले वर्षभर अनेक मातब्बर मंडळींनी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मोर्चेबांधणी केली होती.परंतु त्यांना अपेक्षित आरक्षण न पडल्याने ते काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काही महत्त्वाकांक्षी नेते घरातीलच महिलांना उमेदवारी मिळवून ऐनकेन प्रकारे मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करू शकतात. एकूणच सर्व पक्ष निकराचा संघर्ष करण्यासाठी सज्ज आहेत.परंतू ऐनवेळी कोण कोणाशी युती, हातमिळवणी करणार यावर बरेचसे चित्र अवलंबून आहे. एकूणच सर्व प्रमुख नेत्यांनी ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम म्हणून गंभीरपणे घेतली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies