मुंबई: आज सकाळी मध्य प्रदेशच्या धारमध्ये महाराष्टातील बसला मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली आहे.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना दिल्या. बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.