अकोला: महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोल-डीझेल महाग झाले आहे. महागाईने उच्चांक गाठल्याने वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे. इंधनदर किंचित कमी झाले तर, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळतो. अशातच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात पेट्रोलबाबत मोठे विधान केले.
देशात पुढील पाच वर्षांत पेट्रोल हद्दपार होईल, विदर्भातील बायो-इथेनॉलचा वापर आता वाहनांमध्ये होऊ लागला आहे. ग्रीन हायड्रोजन विहिरीतील पाण्यापासून तयार केला जाऊ शकतो आणि ७० रुपये प्रतिकिलोने विकला जाऊ शकतो, असा दावा गडकरींनी केला आहे.
तसेच, कुणीही शेतकरी केवळ गहू, भात, मक्याच्या शेतीतून आपले भविष्य बदलू शकत नाही. शेतकऱ्यांना केवळ उत्पादक नाही तर उर्जा उत्पादकही व्हावे लागेल, इथेनॉलसंबधी एका निर्णयाने देशाची २० हजार कोटी रुपयांची बचत होत आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरींना विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. या सोहळ्यातील भाषणात नितीन गडकरी यांनी पेट्रोलबाबत मोठे भाष्य केले.