मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केले. शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी सुद्धा विधान सभेत भाषण केले. आम्ही बंड केलेले नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. असे गुलाबराव पाटील यांनी भाषणात म्हटले.
विधानसभेत भाषण करताना गुलाबराव पाटील म्हणाले, 'आमच्यावर अनेकांनी बंड केल्याची टीका होत आहे. आम्हाला जे मिळाले आहे बाळासाहेबांमुळे मिळाले आहे. आम्ही बंड केलेले नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे' अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी करुन दिली.
दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील आमदारांचे आभार मानले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी जोरदार भाषण केले.