मुंबई: ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवक पैकी ६६ नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यात जाऊन भेट घेतली. ६६ माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के समवेत या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजप-शिंदे गट एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेतील या बंडमुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. राज्यातील पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असल्याचे दिसत आहे.
ठाण्यातील नगरसेवकांनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच राहिल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आता अशी दुफळी ठाण्यात निर्माण झाल्याचे चित्र या भेटीमुळे दिसून येत आहे.