![]() |
गोंदवले : वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने स्विप्ट कार पुलावरून बंधाऱ्यात कोसळली. |
म्हसवड/अहमद मुल्ला : वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने स्विप्ट कार पुलावरून बंधाऱ्यात कोसळून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. गोंदवले खुर्द ता माण जवळ आज दुपारी हा अपघात झाला. अपघातातील सर्वजण सोलापूर येथील आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोलापूर येथील बसवराज महादेव झुरळे (27), हणमंत सुखदेव रुपनवर (52), आप्पासो नामदेव काळे (51), वैजनाथ तुकाराम काळे (41) हे स्विप्ट कार (एम.एच.१३-डीई-९२१९) ने देवदर्शनासाठी निघाले होते.
गोंदवले खुर्द पासून पुढे आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पुलावरून थेट बंधाऱ्यात पाण्यात पडली. यामध्ये हणमंत सुखदेव रुपनवर (52), आप्पासो नामदेव काळे (51), वैजनाथ तुकाराम काळे (41) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान या रस्त्यावर वारंवार अपघात होण्याची मालिका सुरू आहे. गेल्या मंगळवारी याच परिसरात अपघात होऊन तीन तरुण जागेवरच ठार झाले होते. यापुर्वीही गोंदवले बुद्रुक ते लोधवडे या अंतरात अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.