![]() |
फोटो : म्हसवड येथे ‘हर घर झेंडा’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी काढलेली प्रभात फेरी. |
म्हसवड/अहमद मुल्ला : देशाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने ‘हर घर झेंडा’ या उपक्रमाचा प्रचार ,प्रसार जनजागृती करण्यासाठी म्हसवड परिसरातील सर्व शाळांतील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य प्रभातफेरी काढण्यात आली.
यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे .स्वातंत्र्य मिळून 75 वर्षझाली असून सर्व देशभर हा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याचे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार माण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील, गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर घर झेंडा’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हसवड बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी प्रभातफेरीचे आयोजन केले.
म्हसवड नगर परिषदचे मुख्यधिकारी सचिन माने, केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार, कृषि विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वभर बाबर, म्हसवडचे सपोनि बाजीराव ढेकळे, मुख्याध्यापक प्रवीण दासरे, राजाराम खाडे यांच्या उपस्थितीत म्हसवड बाजार पटांगणात प्रभातफेरीला सुरुवात झाली. तद्नंतर एसटी स्टँड, सातारा पंढरपूर रोड, रामोशी वेस कमान, शिवाजी चौक, सिध्दनाथ मंदिर,रथ पटांगण मार्गे पुन्हा नगरपरिषद या मार्गे स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत म्हसवड परिसर दुमदुमून गेला.
विशेष म्हणजे घोड्यावर बसलेली झाशीची राणी, बँड पथक, लेझीम हे सर्व आनंददायी वातावरणात चालले होते. न्यू इंग्लिश स्कुल विरकरवाडी येथील मुलींचे गजी नृत्य प्रभातफेरीचे खास आकर्षण ठरले. सूत्रसंचालन राजाराम तोरणे यांनी केले.